Ticker

6/recent/ticker-posts

महापौरपदी कोंड्याल तर उपमहापौरपदी देवकर अविरोध,महापालिकेच्या इतिहासात कोंड्याल हे चौथे अविरोध महापौर


महापालिकेच्या इतिहासात कोंड्याल हे चौथे अविरोध महापौर ठरले; समसमान निधीच्या अटीवर विरोधकांची माघार

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सभागृहात नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी विनायक कोंड्याल तर उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर यांची शुक्रवारी अविरोध निवड करण्यात आली. सोलापूर महापालिकेत ३५ वर्षानंतर महापौर अविरोध करण्याचा इतिहास विनायक कोंड्याल यांनी रचला आहे. ते चौथे अविरोध महापौर ठरले आहेत. 

महानगरपालिकेची निवडणूक झाल्यावर महापौर व उपमहापौर निवडीसाठी महापालिकेची विशेष सभा शुक्रवारी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात (कौन्सिल हॉल) आयोजित करण्यात आली होती. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी हे होते.


सभेचे कामकाज सुरू झाल्यावर सुरुवातीला - महापौरपदासाठी प्राप्त अर्जांची छाननी झाली. यानंतर अर्ज वैध, अवैधची प्रक्रिया पार पडली. सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.  यानंतर निवडणूक अविरोध होण्यासाठी सत्ताधारी गटाकडून विरोधकांची मनधरणी करण्यात आली. यावर समसमान निधी द्यावा या अटीवर शिवसेना शिंदे गट आणि एमआयएम हे दोन्ही पक्ष राजी झाले. यानंतर या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतल्याने महापौरपदाची निवड अविरोध झाली. 





यानंतर उपमहापौरपदाची निवड प्रक्रिया करण्यात आली.   नुकत्याच झालेल्या सोलापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या सभेत अडीच वर्षांच्या कालावधीसाठी महापालिकेतील ३८ वे महापौर व  ३७ व्या उपमहापौरांची निवड करण्यात आली आहे. 


     
दरम्यान शुक्रवारी विशेष सभेसाठी अवघी सोलापूर महापालिका सजली होती. प्रवेशद्वारापासून ते सभागृहात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. या विशेष सभेसाठी सकाळी १०. ५१ वाजता पीठासीन अधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे सभागृहात आगमन झाले. दरम्यान त्यानंतर १०.५५ वाजता शिवसेना शिंदे गटाचे गटनेते अमोल शिंदे यांच्यासह चार नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावांचा जयघोष करत सभागृहात एन्ट्री केली. ठीक अकरा वाजता गळ्यात भगवे उपरणे घालून भाजपचे सर्व नगरसेवक सभागृहात आले. यावेळी व्यासपीठावर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांची उपस्थिती होती.      
           
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक वैभव हत्तुरे यांनी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहून त्यानंतरच सभा सुरू करण्याची सूचना मांडली. शिंदे सेना गटाचे अमोल शिंदे यांनीही त्याला सहमती दर्शवली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सभागृहात दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. 

    
दरम्यान, सकाळी ११ वाजून ०४ मिनिटांनी नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी त्यांच्याकडे महापौर व उपमहापौर पदासाठी इच्छुक उमेदवारांनी दाखल केलेले उमेदवारी अर्ज
पिठासीन अधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्याकडे सुपूर्द केले.
 महापौर पदासाठी भाजपतर्फे विनायक रामकृष्ण कोंड्याल, शिवसेना (शिंदे गट) तर्फे प्रियदर्शन बाळासाहेब साठे तर एमआयएमचे तौफिक बाबुमियाँ हत्तुरे यांचा अर्ज होता. उपमहापौर पदासाठी भाजपकडून ज्ञानेश्वरी महेश देवकर, शिवसेना (शिंदे गट)  प्रियदर्शन बाळासाहेब साठे आणि एमआयएमकडून  आसिफ अहमद पीर अहमद शेख यांचा अर्ज दाखल झाला होता. त्यानंतर पीठासीन अधिकारी गणेश निराळे यांनी या दोन्ही पदासाठीची निवडणूक प्रक्रिया सभागृहाला सांगितली. त्यानंतर ११.०८ वाजता महापौरपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू केली. केलेल्या छाननीत भाजपचे कोंड्याल यांचे दोन्ही अर्ज त्याचबरोबर शिंदे गट आणि एमआयएमच्या उमेदवारांचेही अर्ज वैध ठरले असल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर ठीक ११.०९ ते ११.२४ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटाचा वेळ देण्यात आला. 

विरोधकांनी दोन्ही निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर महापौरपदी विनायक कोंड्याल तर उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर यांची निवड अविरोध झाल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

महापौर,उपमहापौरपदाची निवडणूक अविरोध निवड झाल्यानंतर - नगरसेवक व नगरसेविकांची शुभेच्छापर भाषणे झाली. शिंदे सेनेचे गटनेते अमोल शिंदे,चेतन नरोटे श्रीदेवी फुलारी एमआयएमच्या गटनेत्या वहिदा शेख,अनंत जाधव,गणेश वानकर,रंजीता चाकोते,संगीता जाधव,वंदना गायकवाड,प्रथमेश कोठे,दीपिका येलदंडी यांच्यासह अन्य सदस्यांची भाषणे झाली.





सत्ताधारी व विरोधक यांच्यातील चर्चेनंतर माघार - माघार घेण्याच्या १५ मिनिटांच्या कालावधीत शिंदे गट आणि एमआयएमच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपचे सभागृह नेते नरेंद्र काळे,महापौरपदाचे उमेदवार विनायक  कोंड्याल,अनंत जाधव,किसन जाधव यांनी अमोल शिंदे,चेतन नरोटे यांच्यासह त्यांच्या सदस्यांशी चर्चा केली. अखेर शेवटच्या क्षणी संबंधित एमआयएम आणि शिंदे गटाच्या उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. समान निधी देण्याच्या अटीवर ही उमेदवारी मागे घेतली असल्याचे दोन्ही पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. 

 
नवा पायंडा पाडू नका म्हणत विरोधकांची हरकत - महापौर,उपमहापौरपदाची निवड बिनविरोध झाल्यानंतर डायसवर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी विराजमान व्हावे अशी सूचना काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे आणि अमोल शिंदे यांनी मांडली. मात्र पालकमंत्री येत आहेत,त्यांच्या हस्ते सत्कार होणार आहे,असे सांगत सत्ताधाऱ्यांकडून विलंब लावण्यात आला. त्यास हरकत घेत नवीन पायंडा पाडू नका,तातडीने पदाधिकाऱ्यांना विराजमान होऊ द्या,असे शिंदे आणि नरोटे यांनी सांगितले. पालकमंत्री येत असतील तर येऊ द्या. त्यांचा सन्मान होणे आवश्यक आहे असे भाजपचे नगरसेवक किसन जाधव यांनी सूचित केले. त्यावर आमचा त्यास विरोध नाही मात्र नवा पायंडा पाडू नका अशी अपेक्षा आहे,असे पुन्हा अमोल शिंदे आणि चेतन नरोटे यांनी स्पष्ट केले. चेतन नरोटे यांनी किसन जाधव यांना उद्देशून आता तर व्यवस्थित आमच्याशी बोललात...लगेच आम्हाला चुना.... शास्त्राप्रमाणे सभा चालवा,असा टोला लगावला. मात्र विलंब होत असल्याने अखेर अमोल शिंदे यांनी शुभेच्छापर भाषणही सुरू केले.





पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सत्कार - दरम्यान १२.१२ वाजता पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सभागृहात आगमन झाले. त्यांच्या हस्ते नूतन महापौर व उपमहापौरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार देवेंद्र कोठे,शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर,सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेवक प्रथमेश कोठे,माजी आमदार नरसिंग मेंगजी यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

विनायक कोंड्याल हे ३८ वे महापौर - शुक्रवारी महापौरपदी निवड झालेले विनायक कोंड्याल हे ३८ वे महापौर ठरले. सोलापूर महापालिकेच्या इतिहासात आतापर्यंत एकूण तीन महापौर बिनविरोध निवडण्यात आले आहेत. सामाजिक सौहार्द आणि इतर महत्त्वपूर्ण कारणास्तव या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. मागासवर्गीय प्रवर्गातील पहिले महापौर होण्याचा मान दलितमित्र भीमराव जाधव गुरुजी (१९७४-७५) यांना मिळाला. त्यानंतर मुस्लिम समाजातील पहिली व्यक्ती महापौरपदासाठी उभी राहिल्याने विरोधकांनी उमेदवार उभा न करता सामाजिक सलोखा जपला आणि युन्नूस शेख (१९७५-७६) यांची बिनविरोध निवड झाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत अनुसूचित जाती प्रवर्गातील मुरलीधर पात्रे (१९९०-९१) यांचीही महापौरपदी बिनविरोध निवड झाली होती. ३५ वर्षानंतर आजच्या सभेत भाजपचे विनायक कोंड्याल यांची बिनविरोध महापौरपदी निवड झाली. यामुळे आता बिनविरोध चौथा महापौर होण्याचा मान कोंड्याल यांना मिळाला आहे. या निवडीनंतर त्यांनी एक नवा इतिहास घडवला आहे.सन २०२६ च्या या सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक ८७ जागा जिंकल्या आहेत. विरोधकांना केवळ १५ जागा मिळवता आल्या. एकूणच राजकीय परिस्थिती पाहता यंदाचा महापौर आणि उपमहापौर बिनविरोध होण्याची दाट शक्यता होती. 





सन १९६४ पासून आतापर्यंतचे महापौर - पारसमल जोशी,तात्यासाहेब घोंगडे, इरप्पा बोल्ली,गणेशप्पा बाळी, विश्‍वनाथ बनशेट्टी,राजाराम बुर्गुल,बाबूराव चाकोते,भीमराव जाधव,युन्नूस शेख,भालचंद्र अलकुंटे,विश्‍वनाथ भोगडे,सिद्राम आडम,भगवान चव्हाण,नारायणदास राठी,प्रा.पुरणचंद्र पुंजाल,किशोर देशपांडे,बंडप्पा मुनाळे,महादेव महिंद्रकर, धर्मण्णा सादूल,मुरलीधर पात्रे,उमरखान बेरिया,विश्‍वनाथ चाकोते,मनोहर सपाटे,महेश कोठे,सुभाष पाटणकर, ख्वाजादाऊद नालबंद,शेवंताबाई पवार,जनार्दन कारमपुरी, संजय हेमगड्डी,नलिनी चंदेले,विठ्ठल जाधव,अरुणा वाकसे, आरिफ शेख,अलका राठोड,सुशीला आबुटे,शोभा बनशेट्टी, श्रीकांचना यन्नम व आता विनायक कोंड्याल.





आत्तापर्यंतचे उपमहापौर याप्रमाणे - एम.एन.वडवान, यल्लप्पा जेनुरे,माधवराव कोंतम,फजलेअहमद आडते,ना. व्यं.पिट्टा,ल.आ.साठे,दीनानाथ एरम,प्रा.नसीम पठाण,म.ति. होसमनी,ह.ना.आसादे,त.म.गंभिरे,इस्माईल अल्लोळी, संगप्पा केंगनाळकर,लालसिंग रजपूत,नारायण कोनापुरे, बाळासाहेब घोंगडे,हबीब सय्यद,अभिमन्यू भोसले,वाय.एस. गायकवाड,सुषमाताई घाडगे,इस्माईल बागवान,फातिमा शेख, अरविंद काकडे,माणिकसिंग मैनावाले,प्रमोद गायकवाड, महानंदा भोसले,सुमनताई मुदलियार,अप्पाशा म्हेत्रे,पद्माकर काळे,दिलीप कोल्हे,राजेंद्र कलंत्री,विष्णू निकंबे,हारून सय्यद, प्रवीण डोंगरे व विद्यमान शशिकला बत्तुल,राजेश काळे आणि आता ज्ञानेश्वरी देवकर.

कोंड्याल पद्मशाली समाजाचे नववे महापौर - सोलापूर महापालिकेत यापूर्वी पद्मशाली समाजाचे इरप्पा बोल्ली,राजाराम बुर्गुल,सिद्राम आडम,प्रा.पुरणचंद्र पुंजाल, धर्मण्णा सादूल,महेश कोठे,जनार्दन कारमपुरी,श्रीकांचना यन्नम अशा आठ जणांना महापौरपदाची संधी देण्यात आली होती. त्यानंतर आता या समाजाचे विनायक कोंड्याल यांना संधी मिळाली आहे. कोंड्याल हे पद्मशाली समाजाचे नववे महापौर ठरले आहेत.