सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी नगरसेवक विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी नगरसेवक विनायक कोंड्याल यांची शुक्रवारी ०६ फेब्रुवारी रोजी बिनविरोध निवड झाली. या निवडीप्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते नवनिर्वाचित महापौर तसेच उपमहापौर यांचा सत्कार करण्यात आले.
या वेळी आमदार देवेन्द्र कोठे,सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे,गटनेते नरेंद्र काळे यांच्यासह विविध मान्यवर,लोकप्रतिनिधी,अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौरपदी निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित महापौर कोंड्याल यांची शहरातून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. नागरिकांनी,कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व घोषणांनी आनंद व्यक्त केला.
यानंतर महापौर कोंड्याल यांनी शहरातील थोर महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच सोलापूरचे ग्रामदैवत श्री.शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज, श्री.मार्कंडेय महामुनी व श्री.रूपा भवानी माता यांच्या मंदिरात दर्शन घेऊन शहराच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
महापौरपदाची जबाबदारी स्वीकारताना विनायक कोंड्याल यांनी सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी,नागरी सुविधांच्या बळकटीकरणासाठी तसेच नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
