अप्पर जिल्हाधिकारी गणेश नि-हाळी यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती
सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या ३८ व्या महापौराची निवडणूक लांबणीवर गेली असून आता ३१ जानेवारीऐवजी ६ फेब्रुवारी रोजी सोलापूरला नवा महापौर मिळणार आहे. विभागीय आयुक्तांनी काल सोमवारी महापालिकेला लेखी पत्र पाठवून महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदाची निवडणूक ६ फेब्रुवारी रोजी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी प्रशासकीय स्तरावर जय्यत तयारी करण्यात येत आहे.
या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया राबवण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी गणेश नि-हाळी यांची पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज मानधनावर असलेले नगरसचिव प्रविण दंतकाळे यांच्याशी निवडणूक प्रक्रिया राबवण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी खबरदारीचे उपाय योजण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.
येत्या ३१ जानेवारी शनिवार रोजी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी होणार आहे. त्यासाठी सर्व ८६ नगरसेवक एकत्रीतपणे पुण्याला जाणार आहेत. शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्यावर ही संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. प्रभाग दोनमधून निवडून आलेल्या नगरसेविका शालन शिंदे तुरुंगात असल्याचे त्या हजर राहू शकत नाहीत.
