Ticker

6/recent/ticker-posts

उमेदवारांचे डिपॉझिट जप्त महापालिका निवडणुकीत


महापालिका निवडणूक; 306 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त 

306 पैकी 116 राजकीय पक्षांचे तर 190 अपक्ष उमेदवार

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत किमान आवश्यक मते न मिळाल्याने एकूण 306 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे,अशी माहिती महापालिका  सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांनी दिली. दरम्यान,निवडणूक विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार डिपॉझिट जप्त झालेल्या 306 उमेदवारांपैकी तब्बल 190 उमेदवार अपक्ष असून हे प्रमाण सुमारे 62 टक्के आहे. तर विविध राजकीय पक्षांच्या 116 उमेदवारांचे (38 टक्के) डिपॉझिट जप्त झाले आहे.




 
महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी झाली होती. या निवडणुकीत एकूण 564 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एकूण वैध मतांच्या 1/6 पेक्षा कमी मतदान पडलेल्या उमेदवारांचे डिपॉझिट (अनामत रक्कम) जप्त होते. त्यानुसार एकूण 306 उमेदवारांच्या डिपॉझिट जप्त झाले आहे. राजकीय पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) 19, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) 14, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 29, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) 16 आणि शिवसेना (शिंदे गट) 14 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. तसेच बहुजन समाज पार्टीचे 20 व वंचित बहुजन आघाडीचे 19 उमेदवार आहेत. याशिवाय आम आदमी पार्टी (11), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया - आठवले (6), समाजवादी पार्टी (5) तसेच इतर लहान पक्षांचे उमेदवारही डिपॉझिट जप्त झालेल्यांच्या यादीत आहेत. काही पक्षांचे एक ते दोन उमेदवारच रिंगणात उतरले होते, त्यांचेही डिपॉझिट जप्त झाले आहे. 




           
दरम्यान,या आकडेवारीवरून अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी असल्याने मतविभाजनाचा मोठा फटका बसल्याचे दिसून येते. तसेच राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस,शिवसेना,बीएसपी व वंचित बहुजन आघाडी यांचे प्रमाण तुलनेने जास्त असल्याचे चित्र आहे. वाढती उमेदवारी आणि मतांचे विभाजन याचा थेट परिणाम डिपॉझिट जप्त होण्याच्या संख्येवर झाल्याचे या निकालांवरून स्पष्ट होते. यामध्ये माजी महापौर मनोहर सपाटे,ॲड.यू.एन.बेरीया,माजी नगरसेवक बबलू गायकवाड,मधुकर आठवले,रमेश व्हटकर,रियाज खरादी यांच्यासह अन्य उमेदवारांचा समावेश आहे.





पक्षनिहाय डिपॉझिट जप्त उमेदवार संख्या - डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांच्या पक्षाचे नाव, उमेदवारांची संख्या याप्रमाणे आहे. अपक्ष  190, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) 19, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 14, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 29, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) 16, शिवसेना (शिंदे गट/शिवसेना) 14, बहुजन समाज पार्टी 20, वंचित बहुजन आघाडी 19, आम आदमी पार्टी 11, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) 6, भारतीय जनता पार्टी 2, महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2, समाजवादी पार्टी 5, राष्ट्रीय समाज पक्ष 3, जनविकास क्रांती सेना 3,ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) 2,जनहित सेवा पक्ष 3, महाराष्ट्र विकास आघाडी 1,बहुजन मुक्ती पार्टी 1, हिंदुस्तान जनता पार्टी 1,
राष्ट्रीय जनमंच (सेक्युलर) 2, प्रहार जनशक्ती पक्ष
2, इतर पक्ष 2 असे एकूण 306 जण.