सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026..
सोलापूर : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार सोलापूर जिल्हयातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणुकीचे मतदान शनिवार,दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडणार आहे.
मतदान कर्तव्याकरिता अधिकारी,कर्मचारी,मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असून, नियुक्त मतदान पथकांना शुक्रवार, दि. 6 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून तालुकास्तरावरून साहित्य वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर हे पथक सकाळी 11.30 वाजता नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर पोहोचण्यास सुरुवात करणार आहे.
मतदान प्रक्रिया पार पडणाऱ्या शाळांना शुक्रवार, दि. 6 फेब्रुवारी 2026 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच उद्योग उर्जा,कामगार व खनिकर्म विभागाच्या परिपत्रकानुसार शनिवार,दि. 7 फेब्रुवारी 2026 रोजी निवडणूक होणाऱ्या क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
ज्या शाळांतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची निवडणुकीच्या कामाकरिता नियुक्ती केलेली नाही, त्या शाळांना शुक्रवार, दि. 6 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते 11.30 या वेळेत शाळा भरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सदर आदेशाचे तात्काळ पालन करण्यात यावे,असे प्रभारी जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
