सोलापूर शहरातील पावसाळी पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना
७४ नाल्यांचा पर्जन्यजल नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन आराखड्यास आयुक्तांची मंजुरी.
सोलापूर : सोलापूर शहरामध्ये दरवर्षी पावसाळ्यात सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याच्या घटना घडत असून यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. सन २०१८, २०२० व २०२५ या वर्षांमध्ये शहरातील विविध भागांमध्ये गंभीर जलसंचयाची परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाळी पाण्याचा योग्य निचरा न होणे,नैसर्गिक जलप्रवाहांमध्ये अडथळे निर्माण होणे तसेच नाल्यांवरील अतिक्रमण ही यामागील प्रमुख कारणे आहेत.
ही परिस्थिती भविष्यात पुन्हा उद्भवू नये,याकरिता सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली पर्जन्यजल नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची व्यापक कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. यासाठी अतिरिक्त आयुक्त,नगर अभियंता,सार्वजनिक आरोग्य अभियंता,संबंधित नगरसेवक, तक्रारदार नागरिक व महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यासह संयुक्त बैठका घेण्यात आल्या.
शहरातील ७४ नाल्यांचे सर्व्हेक्षण व ६ बेसिनमध्ये विभागणी
सोलापूर शहराच्या १७८ चौरस किलोमीटर क्षेत्राचे गुगल सॅटेलाईट इमेज, टोपोशीट, ड्रोन सर्व्हेक्षण व टोटल स्टेशन सर्व्हेक्षणाच्या आधारे सखल व उंच भागांचा अभ्यास करून शहरातील पावसाळी पाण्याचे ७४ नाले निश्चित करण्यात आले आहेत. हे नाले एकूण ६ बेसिनमध्ये विभागले असून त्यांची एकूण लांबी सुमारे ११५.७७ कि.मी. इतकी आहे.
पूर नियंत्रण सर्व्हेक्षण पथकाची स्थापना - आयुक्त तथा अध्यक्ष,शहर आपत्ती व्यवस्थापन समिती यांच्या आदेशानुसार दि. १९/०१/२०२५ रोजी पूर नियंत्रण सर्व्हेक्षण पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन नाल्यांचे संरेखन,अतिक्रमणे,नैसर्गिक प्रवाहातील बदल,घरांची माहिती,महसूल रेकॉर्ड,बांधकाम परवानग्या आदींचा सखोल अभ्यास करून सविस्तर तांत्रिक अहवाल तयार केला आहे.
तात्पुरत्या व कायमस्वरूपी उपाययोजना आराखड्यामध्ये खालीलप्रमाणे - उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत
नाल्यांची सफाई, गाळ काढणे व प्रवाह मोकळा करणे
अतिक्रमणे,संरक्षण भिंती,रॅम्प,भराव आदी काढून नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करणे आवश्यक ठिकाणी नाल्यांची रुंदी व खोली वाढविणे गजबजलेल्या भागात अपवादात्मक परिस्थितीत भूमिगत नाल्यांची तरतूद क्रॉस ड्रेनेज,बॉक्स कल्व्हर्ट,ब्रिज,रोड साईड चर इत्यादींची उभारणी विकास आराखड्यात नाल्यांचा समावेश नगररचना विभागाच्या माध्यमातून ड्रोन फोटोग्राफी,सॅटेलाईट इमेज व प्रत्यक्ष सर्व्हेक्षणाच्या आधारे नाल्यांचे अंतिम संरेखन निश्चित करून प्रस्तावित विकास आराखड्यात त्यांचा समावेश करण्यात आला आहे. एकूण ७४ नाल्यांपैकी ३० नाल्यांसाठी पहिल्या टप्प्यात प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार मंजुरी - आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २६ व कलम ३० अंर्तगत प्राप्त अधिकारास अनुसरून तसेच केंद्रशासनाचे विधी व न्याय मंत्रालय यांचेकडील आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील दि. २९ मार्च २०२५ च्या (Amendment) दुरुस्तीमधील कलम ४१A नुसार शहर प्राधिकरण (Urban Authority) स्थापित करून आयुक्त,सोलापूर महानगरपालिका,सोलापूर यांना शहर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून अधिकार प्राप्त झाले असून,दि. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या आढावा बैठकीत ७४ नाल्यांचा पर्जन्यजल नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन आराखडा,तांत्रिक अहवाल तसेच तात्पुरत्या व कायमस्वरूपी उपाययोजनांना सक्षम मंजुरी देण्यात आली आहे.
माहिती वेबसाईटवर उपलब्ध - सोलापूर शहर आपत्ती व्यवस्थापन आराखडा,पर्जन्यजल नियंत्रण आराखडा, नालानिहाय सर्व्हेक्षण अहवाल व समिती बैठकींचे इतिवृत्तांत सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. https://www.solapurcorporation.gov.in/smc/dmp_plan_details सोलापूर शहरातील पावसाळी पाणी साचण्याच्या समस्येवर शाश्वत व कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे महानगरपालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
