Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामस्थांनी आपला लोकसहभाग वाढवून मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान यशस्वी करावे - किर्तनकार शिवलिलाताई पाटील

मुख्यमंत्री समृध्द पंचायराज अभियान अंतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रम

सांगोला : समाजातील व्यक्ती व गाव समृध्द झाल्याशिवाय आपला जिल्हा व राज्य समृध्द होत नाही म्हणून ग्रामस्थांनी आपला लोकसहभाग वाढवून मनगटाच्या जोरावर मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान यशस्वी करावे. या अभियानाच्या माध्यमातून अकोला (ता.सांगोला ) हे गाव जिल्हा व राज्यात समृध्द करावे असे आवाहन ह.भ.प.शिवलीलाताई पाटील यांनी केले.




  
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत जिल्हा परिषद,सोलापूर,पंचायत समिती,सांगोला,ग्रामपंचायत अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला (ता.सांगोला ) येथील सरदार शामराव लिगाडे विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या किर्तनाच्या विशेष जनजागृती कार्यक्रमामध्ये ह.भ.प.शिवलीलाताई पाटील या बोलत होत्या.त्या म्हणाल्या, वारकरी सांप्रदायामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये ७५० वर्षापूर्वी ग्रामीण विकासाचा संदेश दिला आहे. गाव,नगरे समृध्द व हरीत झाली पाहिजेत. अन्यथा सामर्थ्याने सांप्रदाय करणे अयोग्य आहे.
   
आज गावातील ग्रामस्थांनी मनावर घेतले तर मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान यशस्वी होईल. त्यासाठी ग्रामस्थांनी श्रमदानासाठी पुढे या.गावातील लोकांसाठी काम करा. स्वच्छतेसाठी पुढे या.गावात शाश्वत स्वच्छतेचा संस्कार झाला पाहिजे असे सांगून त्यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ही गावाला मिळालेली देणगी आहे. हे अभियान सोलापूर जिल्हयात सर्व गावात अत्यंत प्रभावीपणे राबवून जिल्हयाचा लौकिक राज्यात वाढवावा अशी अपेक्षा किर्तनकार ह.भ.प.शिवलिलाताई पाटील यांनी व्यक्त केली.



   
याप्रसंगी माजी अध्यक्षा जयमाला गायकवाड,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सुर्यकांत भुजबळ,गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी,सहाय्यक गट विकास अधिकारी वसंत फुले,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव,सहाय्यक प्रशासन अधिकारी सिध्दाराम बोरूटे,कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुहास चेळेकर,सचिन सोनवणे,श्रीधर कलशेटटी,हणमंत गायकवाड, विस्तार अधिकारी अमोल तोडकरी, देवराज पुकळे,विस्तार अधिकारी (कृषी) बाबासाहेब खटकाळे, अभिजीत पवार,मिलिंद सावंत,पुंडलिक गंगधे,सरपंच धनश्री गव्हाणे, उपसरपंच महादेव शिंदे,माजी जि.प.सदस्य अशोक शिंदे,माजी पं.स.सदस्य नंदकुमार शिंदे,ग्रामपंचायत अधिकारी डी.आर.लंगोटे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट - गाव स्वच्छ , समृध्द व सक्षम करण्यासाठी ग्रामस्थांचे योगदान महत्वाचे -मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम
    
सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी स्वच्छ,समृध्द व सक्षम पंचायत करणे तसेच स्वच्छतेबरोबर पर्यावरण संवर्धन,लोकवर्गणी व पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी योगदान देणे अपेक्षित आहे. - मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी,ग्रामपंचायतींना सक्षम करण्यासाठी आणि लोकसहभागातून सुशासन आणण्यासाठी सुरू केलेले एक राज्यस्तरीय अभियान आहे, ज्या अंतर्गत चांगले प्रशासन,पायाभूत सुविधा,योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि पुरस्कारांद्वारे ग्रामपंचायतींना प्रोत्साहन दिले जाते.सदर अभियानांतर्गत  ऑनलाइन सेवा,पाणीपुरवठा, स्वच्छता, आणि रोजगार निर्मिती ज्यात विविध घटकांवर लक्ष केंद्रित केले आहे. - उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सुर्यकांत भुजबळ