महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ : मतदान केंद्र कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण; आयुक्त व उपायुक्तांचे मार्गदर्शन, गैरहजरांवर कडक कारवाईचा इशारा
सोलापूर : सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व कायदेशीर पद्धतीने पार पाडण्यासाठी मतदान केंद्रांवर नियुक्त करावयाच्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या पूर्ण करण्यात आलेल्या असून संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश पाठविण्यात आलेले आहेत. नियुक्त कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावरील कामकाजाबाबत सखोल व प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यासाठी दिनांक २९, ३० व ३१ डिसेंबर २०२५ तसेच ०९, १० व ११ जानेवारी २०२६ रोजी हुतात्मा स्मृती मंदिर व छत्रपती शिवाजी महाराज सभागृह,रंगभवन येथे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सदर प्रशिक्षण हे दररोज दोन सत्रांमध्ये घेण्यात येत असून प्रत्येक दिवशी सुमारे २५०० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे तसेच उपायुक्त श्री. आशिष लोकरे यांनी उपस्थित राहून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी मतदान प्रक्रिया पारदर्शक,निर्भय व कायद्यानुसार पार पाडण्याचे महत्त्व सांगून,मतदान केंद्रावरील जबाबदाऱ्या,शिस्तबद्ध कामकाज व निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या. प्रशिक्षणामध्ये मतदान केंद्रावरील कर्तव्ये,मतदार ओळख प्रक्रिया,मतदान यंत्र (EVM) व VVPAT ची हाताळणी,निवडणूक आचारसंहिता तसेच मतदान दिवशी घ्यावयाची दक्षता याबाबत सविस्तर माहिती देण्यात येत आहे.
प्रशिक्षणानंतर संबंधित ठिकाणी मतदान यंत्रांची प्रत्यक्ष हाताळणी व प्रात्यक्षिक देखील दाखविण्यात येत असून कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यावर भर देण्यात येत आहे. दरम्यान,प्रशिक्षणास गैरहजर राहणारे कर्मचारी,तसेच निवडणूक कामकाजासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना कार्यभारातून कार्यमुक्त न करणाऱ्या संस्था,तसेच निवडणूक आदेश रद्द करण्याबाबत दबाव तंत्राचा वापर करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
या संदर्भात भारतीय लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील कलम १३४ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश डॉ.सचिन ओम्बासे,आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी,सोलापूर महानगरपालिका यांनी दिलेले आहेत.
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक शांततेत, निर्भय वातावरणात व कायद्याच्या चौकटीत पार पडावी यासाठी सर्व संबंधित कर्मचारी,संस्था व प्रशासनाने पूर्ण सहकार्य करावे,असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.
