Ticker

6/recent/ticker-posts

प्रत्येक नागरिकांनी सजग ग्राहक बनावे - अप्पर जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी कार्यालय व अन्नधान्य वितरण कार्यालय आयोजित प्रदर्शन व जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

सोलापूर : राष्ट्रीय ग्राहक दिन हा ग्राहक हक्कांचे संरक्षण व  जागरूकतेचा दिवस आहे. तो केवळ कायद्याची आठवण करून देत नाही,तर प्रत्येक नागरिकाला सजग ग्राहक बनण्याचे आवाहन करतो,असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी केले.

जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त अध्यक्ष स्थानावरून निऱ्हाळी मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे,अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे,जिल्हा ग्राहक तक्रार समिती सदस्य भारती सोनवणे,जिल्हा ग्राहक पंचायत अध्यक्ष शशिकांत हरिदास,शोभना सागर,तानाजी गुंडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.




अप्पर जिल्हाधिकारी निऱ्हाळी पुढे म्हणाले की,सर्व नागरिकांनी आपल्या हक्काबाबत सजग राहिले पाहिजे. कोणीही कोणत्याही प्रकारची आपली फसवणूक करणार नाही या दृष्टीने खरेदी करताना वस्तू विषयी माहिती जाणून घेतली पाहिजे. ग्राहक दिन हा एका दिवसापुरता साजरा न करता कायमस्वरूपी प्रत्येक खरेदी विक्री व्यवहारात प्रत्येक नागरिकांनी अत्यंत जागृत राहिले पाहिजे. तसेच इतर सर्वसामान्य नागरिकांचेही त्या दृष्टीने प्रबोधन केले पाहिजे, जेणेकरून फसवणूक होऊ नये असे त्यांनी सांगितले. तसेच राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित केलेले स्टॉल सर्वांनी पहावे व त्याबद्दल माहितीही घ्यावी,असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हा ग्राहक तक्रार समिती सदस्य भारती सोनवणे यांनी प्रथम सर्वांना ग्राहक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व ग्राहक संरक्षण कायदे अंतर्गत ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा जलद व्हावा या दृष्टीने सर्व नागरिकांचे समाज प्रबोधन व्हावे यासाठी सरकारने २०१९ साली सुधारित ग्राहक हक्क कायद्यात सुधारणा केली असं सांगितले. सर्व ग्राहकांनी सावध रहावे व काही शंका वाटल्यास हेल्पलाइन चा वापर करून तक्रार नोंदवावी जेणेकरून इतर कोणाची फसवणूक होणार नाही. ही सर्व यंत्रणा राबविण्यासाठी शासनाकडे पुरेसे मनुष्यबळ नाहीये. त्यामुळे तक्रार निवारणाच्या गोष्टीसाठी विलंब होत आहे.
 



शोभना सागर यांनी ग्राहकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीची स्थापना करण्यात आलेली आहे असे सांगितले. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की,तुम्ही भावी पिढीचे शिलेदार आहात व ग्राहक देखील आहात. त्यासाठी तुम्ही सर्वांनी देखील ग्राहक हक्क विषयी माहिती करून घेणे गरजेचे आहे.

शशिकांत हरिदास म्हणाले की,हे धोरण अंमलात आणण्यासाठी शासकीय स्तरावर संगणक प्रणाली,पुरेसे मनुष्यबळ कार्य प्रणाली नाही व अन्नधान्यामध्ये होणारी भेसळ ओळखण्यासाठी प्रयोगशाळा देखील नाही. ही सगळी यंत्रणा राबवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ देखील नाहीये. आधुनिक यंत्रणेचा अभाव असल्यामुळे शासनाने ही यंत्रणा सक्षम करावी जेणेकरून ग्राहकांना वेळोवेळी न्याय मिळेल अशी व्यवस्था निर्माण होईल.




राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा सर्व नागरिक ग्राहकांचे हक्क सुरक्षा व तक्रार निवारण या अनुषंगाने माहिती करून देणे हा असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी सांगितले. तसेच इसवी सन १९८६ साली ग्राहक हक्क कायद्याला राष्ट्रपतींनी मान्यता दिली. हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी अनेक संस्थांनी व कार्यकर्त्यांनी अस्तित्वात आला. तेव्हापासून ग्राहक दिन साजरा करण्यात येतो.
 

ग्राहकांचे सहा प्रमुख हक्क काय आहेत त्याबद्दल त्यांनी माहिती सांगितली.
१) सुरक्षेचा हक्क 
२) माहितीचा हक्क
३) निवड करण्याचा हक्क
४) म्हणणे मांडण्याचा हक्क
५) तक्रार निवारण करण्याचा हक्क 
६) ग्राहक हक्क 
असे सहा मूलभूत हक्क आहेत. याबद्दल जनजागृती व्हावी या उद्दिष्टाने या कार्यक्रमाचे प्रत्येक वर्षी आयोजन करण्यात येते. बनावट जाहिरातीद्वारे ग्राहकांची होणारी फसवणूक यावर उपाय म्हणजे ग्राहकांनी त्याबाबतीत तक्रार नोंदवायची असल्यास हेल्पलाइन चा वापर करावा व वेबसाईटवर देखील तुम्ही तक्रार नोंदवू शकता असे सांगितले. हेल्पलाइन नंबर - 1800 11 4000 किंवा Consumerhelpline.gov.in या संकेतस्थळावर देखील तुम्ही तक्रार नोंदवू शकता असे सांगितले. ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना नेहमी त्यावरील आयएसआय मार्क चेक करावा व त्या वस्तूची एक्सपायरी डेट नेहमी आवर्जून तपासावी. या सर्व गोष्टींचा हक्क प्रत्येक ग्राहकाला आहे.

प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. शाहीर रमेश खाडे यांनी संगणकीय न्यायबुद्धी धोरण या विषयावर पोवाडा गायला. राजन घाडगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 

विविध विभागाचे स्टॉल - या कार्यक्रमानिमित्त विविध स्टॉलचे आयोजन देखील करण्यात आलेले होते त्यांची नावे पुढील प्रमाणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय,पोलीस आयुक्त शहर वाहतूक,महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ,महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी मर्यादित,अन्न व औषध प्रशासन,जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा,वैध मापन शास्त्र यंत्रणा,राज्य विधी सेवा प्राधिकरण.