महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून नजीब शेख यांच्यावर मोठी जबाबदारी
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या अल्पसंख्यांक जिल्हा शहराध्यक्षपदी नजीब शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयात आयोजित कार्यक्रमात शहराध्यक्ष संतोष पवार,कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या उपस्थितीत नजीब शेख यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी जेष्ठे नेते सुधीर खरटमल,मकबूल मोहोळकर,किसन जाधव,आनंद मुस्तारे,बसवराज कोळी,महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम यांची उपस्थिती होती.
नजीब शेख हे अल्पसंख्यांक समाजामध्ये प्रभावी पकड असलेले कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. शहराध्यक्ष संतोष पवार,कार्याध्यक्ष जुबेर बागवान तसेच अल्पसंख्यांकचे माजी शहराध्यक्ष आमेर शेख यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्ती स्वीकारल्यानंतर नजीब शेख यांनी पक्षवाढीसाठी जोमाने काम करणार असल्याचे सांगितले. अल्पसंख्यांक समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच जाहीर झाली असून,या पार्श्वभूमीवर नजीब शेख यांच्या नियुक्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे अल्पसंख्यांक मतदारांमध्ये पक्षाला बळ मिळेल,असा विश्वास राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. या नियुक्तीमुळे आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला निश्चितच फायदा होईल,असं मत व्यक्त करण्यात येत आहे.
