आंतरराज्यीय हाय प्रोफाईल कार चोरी प्रकरणातील ४ आरोपींना सत्र न्यायालय सोलापूर येथून सशर्त जामीन मंजूर!
सोलापूर : आंतरराज्यीय चारचाकी वाहन चोरीच्या प्रकरणात सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गु.र.क्र. ०४९९/२०२५, दिनांक २४ सप्टेंबर २०२५, नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३(५), ३१८(४), ३३६(२), ३३६(३) व ३४०(२) प्रमाणे आरोपी क्र. १) अजीम सलीमखान पठाण,वय ३६ वर्षे, रा.रहिमतपूर, ता.कोरेगाव,जि.सातारा,आरोपी क्र.२) प्रमोद सुनिल वायदंडे,वय २६ वर्षे,रा.धामनेर स्टेशन,रहिमतपूर,ता. कोरेगाव,जि.सातारा,आरोपी क्र. ३) फिरोज शीराज मोहम्मद,वय ३५ वर्षे, रा.आर.टी.नगर,बेंगलोर,कर्नाटक, आरोपी क्र.४) इरषाद सफिउल्ला सय्यद,वय ३४ वर्षे, रा. मुलबागल,कोलार,कर्नाटक,यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता.
दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक विजयकुमार राजशेखर भरले हे स.पो.नि भिमगोंडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह सोलापूर तालुका परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मुळेगाव तांडा परिसरात इंडियन ऑईल पंपासमोर संशयास्पद स्थितीत असलेली पांढरी रंगाची टोयोटा फॉरच्युनर (क्र. MH-45/AW-5577) दिसून आली.
सदर वाहनातील चार इसमांकडे वाहनाचे वैध कागदपत्रे नसल्याने अधिक चौकशी केली असता,वाहनाचे इंजिन व चेसी क्रमांक बनावटरीत्या बदलून प्रिंट केल्याचे निष्पन्न झाले. वाहनाच्या मालकाची पडताळणी केली असता,तोच क्रमांक असलेले मूळ वाहन तन्वीर बाबासाहेब मुलाणी (रा.टेंभूर्णी) यांच्या ताब्यात असल्याचे आढळले. तपासादरम्यान उघड झाले की, आरोपी हे दिल्ली आणि मेरठ परिसरातून चोरी केलेली वाहने महाराष्ट्रात आणत असत. या वाहनांचे मूळ इंजिन आणि चेसी क्रमांक काढून त्यावर बनावट क्रमांक प्रिंट करून,खोटी आर.टी.ओ.स्मार्ट कार्ड तयार करून विक्री करत होते.
संबंधित प्रकरणातील तपासादरम्यान आरोपींच्या ताब्यातून ५ अलीशान कार (१ टोयोटा फॉरच्युनर, ३ ह्युंडाई क्रेटा, १ मारुती ब्रेझा) व मोबाईल हँडसेट असा एकूण ₹८३,८०,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
सदर घटनेतील चारही आरोपींनी सत्र न्यायालय, सोलापूर येथे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी घेतल्यानंतर दिनांक ०७/१०/२०२५ रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ऐश्वर्या जाधव यांनी आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणात आरोपीतर्फे - ॲड.कदीर औटी,ॲड.दत्तात्रेय कापुरे,ॲड.वैभव बोंगे,ॲड.पैगंबर सय्यद,ॲड.ओंकार फडतरे,ॲड.मोहीम पठाण,ॲड.शिवरत्न वाघ,ॲड.मनिष बाबरे,ॲड. अभिषेक नागटिळक आणि ॲड.त्वरिता वाघ यांनी काम पाहिले आणि सरकारतर्फे ॲड.अमोघसिद्ध कोरे यांनी काम पाहिले.
