समर्थ सहकारी बँकेवर आरबीआयचे निर्बंध; खातेदारांची धावपळ सुरू
सोलापूर : भारतीय रिझर्व्ह बँकेने सोलापूरातील समर्थ सहकारी बँकेवर कठोर निर्बंध लादले आहेत. ७ ऑक्टोबर २०२५ पासून लागू झालेल्या या निर्बंधांनुसार, बँकेला कोणतेही नवे कर्ज,ठेवी स्वीकारणे किंवा गुंतवणूक करणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. बँकेच्या फोनपे,एटीएम आणि इतर सर्व व्यवहार सेवा तत्काळ थांबल्या असून खातेदारांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
जिल्ह्यात शंकराव मोहिते पाटील बँक,त्यानंतर लक्ष्मी बँक आणि आता समर्थ सहकारी बॅँकेवर रिझर्व बँकेने निर्बंध आणले आहे. रिझर्व बँकेने मंगळवारी काढलेले परिपत्रक रात्री व्हायरल होताच खातेदारकांची झोप उडाली. बुधवारी सकाळपासून सोलापूर शहरातील समर्थ बँकेच्या सर्वच शाखांमध्ये खातेदार-ठेवीधारकांनी प्रचंड मोठी गर्दी केली. रिझर्व बँकेने सर्व प्रकारचे व्यवहार करण्यावर निर्बध घातल्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर व्यापाऱ्यांचे देखील खूप मोठे नुकसान झाले. लॉकर्स असणानऱ्यांनी आमचे साहित्य बाहेर काढू द्या यासाठी गोंधळ सुरू केला. समर्थ बँकेच्या दत्त चौक,सात रस्ता, सुराणा मार्केट,होटगी रोड,जुळे सोलापूर टिळक चौक,साखरपेठ तसेच एमआयडीसी या भागात असलेल्या शाखांमध्ये बुधवारी सकाळपासून बँकेच्या ग्राहकांनी प्रचंड मोठ्या रांगा लावल्या. अनेक ठिकाणी तर बॉन्सर आणि पोलीस बोलवावे लागले. अर्थकरी समर्थ हे ब्रीदवाक्य घेऊन गेली ३० वर्ष सोलापुरात अविरतपणे सेवा देणाऱ्या समर्थ बँकेवर अशी परिस्थिती आल्याने सहकारी बँकांची चिंता वाढली आहे. ग्राहकांनी तसेच ठेवीदारांनी घाबरू नये लवकरच आम्ही बॅँक पूर्वपदावर आणू असे परिपत्रक चेअरमन दिलीप अत्रे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिले.
आरबीआयने सांगितले की,बँकेची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी वारंवार सूचना देऊनही ठोस सुधारणा झाल्या नाहीत,त्यामुळे ठेवीदारांच्या हितासाठी हे पाऊल उचलावे लागले. ठेवीदारांना ५ लाखांपर्यंत ठेव विमा योजनेअंतर्गत संरक्षण मिळेल.अधिक माहितीसाठी ठेवीदारांनी बँकेशी किंवा www.dicgc.org.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा,असे आवाहन आरबीआयने केले आहे. हे निर्बंध सहा महिन्यांसाठी लागू राहतील आणि या कालावधीत आरबीआय बँकेची स्थिती सतत तपासणार आहे.
