पुणे : समाजकारण आणि पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते रज्जाक साहेबलाल शेख यांना प्रतिष्ठित "भारत भूषण पुरस्कार" प्रदान करण्यात आला. हा भव्य पुरस्कार सोहळा २४ ऑगस्ट रोजी पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे पार पडला.
सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता बाळराजे वाळुंजकर,प्रबोधनकार सचिन देवरे,अभिनेत्री भक्ती साधू,ॲड.उमाकांत आदमाने आणि हिमांशू जैन उपस्थित होते. त्यांच्या हस्ते रज्जाक शेख यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना रज्जाक शेख म्हणाले, “पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित नसून,समाजातील उपेक्षितांचा आवाज बनण्याचे माध्यम आहे. हा पुरस्कार माझ्या वैयक्तिक कामाचा नाही,तर समाजासाठी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांचा सन्मान आहे.”
प्रमुख पाहुण्यांनीही आपले विचार व्यक्त केले. बाळराजे वाळुंजकर म्हणाले, “सामाजिक भान जपणारी पत्रकारिता समाज परिवर्तनाला चालना देते. रज्जाक शेख यांच्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे.” सचिन देवरे यांनी त्यांच्या प्रबोधनकारी लेखनाची प्रशंसा केली, तर भक्ती साधू यांनी पत्रकारांच्या सामाजिक भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. ॲड.उमाकांत आदमाने आणि हिमांशू जैन यांनीही शेख यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे आयोजन साऊ ज्योती सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सचिन हळदे,सहआयोजक विकास उबाळे,पत्रकार सचिन सोनकांबळे,दिपक राणे आणि जहीर पटेल यांनी कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन केले.
विविध क्षेत्रातील मान्यवर,सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार वितरणानंतर उपस्थितांनी रज्जाक शेख यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.