१ कोटी ३८ लाखांच्या ६९२ किलो गांजासह तीन वाहनं जप्त
एकास अटक,दोघे फरार : बार्शी पोलिसांची कारवाई
सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील बार्शी पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ६९२ किलो गांजा जप्त केला आहे. संशयीत आरोपींनी ट्रक मधून रासायनिक खताची वाहतूक होत असल्याचे भासवत खतासोबत गांजाच्या गोण्या भरून नेताना बार्शी ग्रामीण पोलिसांनी एक कोटी ३८ लाख ४० हजार रुपये किमतीचा गांजा व २५ लाख रुपये किमतीची तीन वाहने जप्त केली आहे. पोलिसांनी एकास पाठलाग करून अटक केली. ही कारवाई गुरुवारी सकाळी बार्शी ते भूम मार्गावरील भोयरे शिवारात करण्यात आली. कारवाई दरम्यान तिघे घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
कंटेंनर मधून गांजा छोट्या वाहनात वितरित केले जात होतं - बार्शी ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत कोट्यावधी रुपयांचा गांजा जप्त केला आहे. या कारवाईत अंकुश दशरथ बांगर( रा.भोयरे ता.बार्शी ) या संशयीत आरोपीस अटक केले आहे. घटनास्थळी उप विभागीय पोलिस अधिकारी अशोक सायकर,पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे,एपीआय दिलीप ढेरे यांच्यासह शहर व तालुका पोलिस ठाण्याच्या अधिकार्यांनी भेट दिली. बार्शी शहरापासून सात किलोमीटर अंतरावर भोयरे शिवारात असलेल्या एका वस्तीजवळ रस्त्याचे कडेला एका कंटेनर ट्रॅक मधून दुसर्या आयशर टेम्पोमध्ये गांजाची पोती भरली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
१ कोटी ६३ लाखांचा मुद्देमाल जप्त - बार्शी तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रक व टेम्पोत पाहणी केली. दरम्यान आरोपींना पोलिसांचा सुगावा लागताच तेथून तिघेजण पळून गेले. पळून जाणार्या भोयरे येथील एकाला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. ट्रक व टेम्पोमधून ६९२ किलो वजनाचा एक कोटी ३८ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे तर २५ लाखाची तीन वाहने असा एकूण एक कोटी ६३ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी सुरू करण्यात आलेली गांजांच्या गोण्याची मोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्रीपर्यंत सुरू होती. अधिक तपास सपोनी दिलीप ढेरे करत आहेत.
बार्शी पोलिसांची धाडसी कारवाई - ही कामगिरी जिल्हा पोलिस प्रमुख अतुल कुलकर्णी अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर,उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नी.बालाजी कुकडे,स.पो.नी.दिलीप ढेरे,अभय उंदरे,मंगेश बोधले,युवराज गायकवाड,सिद्धेश्वर लोंढे, सागर शेंडगे,उत्तरेश्वर जाधव,अविरत बरबडे,राहुल बोंदर, यांच्या पथकाने केली.