राज्य कर सेवेतील दोन अधिकारी पाच हजार रुपयांसाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात
सोलापूर : सोलापूर शहरातील वस्तू व सेवा कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांनी पाच हजार रुपयांची किरकोळ लाच घेताना अब्रू घालवली आहे. राज्य कर अधिकारी महेश जरीचंद चौधरी, (वय ४१ वर्षे,रा हरिश्चंद्र नगर,धाराशिव,पद राज्य कर अधिकारी),नेमणूक वस्तु व सेवा कर कार्यालय सोलापूर व आमसिध्द इराण्णा बगले, (रा,रेणुका नगर,जुळे सोलापूर,पद-राज्य कर निरीक्षक,) नेमणूक वस्तु व सेवा कर कार्यालय. अशी अधिकाऱ्यांची नावे आहेत. एका खाजगी फर्मला जीएसटी क्रमांक देण्यासाठी फक्त पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टीमने सोलापूर शहरात कारवाई केली आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद झाला आहे. लाखभर पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर पाच हजार रुपयांची लाच घेताना कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. राज्य कर निरीक्षक आमसिद्ध बगले याने पाच हजार रुपये लाच स्वीकारून राज्य कर अधिकारी महेश चौधरी यांच्या टेबलावरील फाईल खाली ठेवली होती.
अँटी करप्शनने दिलेल्या माहितीनुसार सविस्तर हकीकत - सोलापूर मधील एका तक्रारदाराने अँटी करप्शन सोलापूर युनिट यांच्याकडे तक्रार केली होती. प्राप्त तक्रारीनुसार सापळा लावण्यात आला होता. तक्रारदार यांच्या मालकीचे कंन्स्ट्रक्शन ॲन्ड सर्विंग फर्म आहे. तक्रारदार याने फर्मच्या नावे वस्तु व सेवाकर कार्यालय येथे नवीन जीएसटी क्रमांक मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. वस्तू व सेवा कर कार्यालयातील राज्य कर अधिकारी महेश जरीचंद चौधरी,राज्य कर निरीक्षक आमसिध्द इराण्णा बगले यांनी तक्रारदार यांना नवीन जी.एस.टी क्रमांकास मंजूरी देणेकरीता तक्रारदार यांच्याकडे ५,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती.
पाच हजार घेतले अन् अधिकाऱ्याच्या टेबलावरील फायलीच्या खाली ठेवले - एसीबी अधिकाऱ्यांनी जीएसटी कार्यालयातील अधिकारी लाच मागत असल्याची पडताळणी केली. २१ ऑगस्ट गुरुवार रोजी सापळा लावण्यात आला. जीएसटी इन्स्पेक्टर आमसिद्ध बगले यांनी पाच हजार रुपये स्वीकारून ती लाच रक्कम जीएसटी अधिकारी महेश जरीचंद चौधरी यांच्या टेबलावरील फाईलखाली ठेवली. त्याचवेळी एसीबी अधिकाऱ्यांनी धाड टाकून जीएसटी कार्यालयातील दोन्ही अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. घटनास्थळी पंचनामा करून विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद केला. जीएसटी कार्यालयातील दोन्ही संशयीत आरोपींना रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई एसीबीचे उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेश पवार (पोलीस निरीक्षक,एसीबी), गणेश पिंगुवाले (पोलीस निरीक्षक,एसीबी, सोलापूर),पोह/ अतुल घाडगे,पोह सलीम मुल्ला,पोना स्वामीराव जाधव,पोह राहुल गायकवाड,यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.