व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य महिला शिखर अधिवेशनाची फलश्रुती
राज्यनाततून अनेक पत्रकार महिलांचा सहभाग
नाशिक : (प्रतिनिधी) नाशिकच्या ज्ञानगंगा परिसरात नुकतेच संपन्न झालेले दोन दिवसीय व्हॉईस ऑफ मीडिया महिला पत्रकारांचे राज्य शिखर अधिवेशन केवळ एका उपक्रमाचे आयोजन न राहता,पुढील दिशादर्शक आणि क्रांतिकारी संकल्पनेच्या जन्माचे व्यासपीठ ठरले. या अधिवेशनातून उदयास आलेली “मिशन महाराष्ट्र” ही संकल्पना पत्रकारितेच्या भविष्याचा नव्याने वेध घेणारी ठरली आहे. हतबल,विवश झालेल्या पत्रकारितेला स्वाभिमानी आणि स्वावलंबी बनविण्याचा राजमार्ग व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या नेतृत्वात या अधिवेशनातून सापडल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रांगणात भरलेल्या या अधिवेशनात राज्यभरातून आलेल्या शेकडो महिला पत्रकारांनी सहभाग घेतला. पत्रकारिता क्षेत्रातील विविध अनुभव,अडचणी,स्थानिक समस्या आणि शक्यता यावर खुलेपणाने संवाद झाला.
या संवादातून,चर्चेतून आणि प्रत्यक्ष अनुभवांच्या आदानप्रदानातून संदीप काळे यांनी एक महत्त्वाकांक्षी आणि दूरदृष्टी असलेली योजना मांडली – मिशन महाराष्ट्र.
ही एक सामाजिक-आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या दूरदृष्टीची योजना असून,पत्रकारितेत कार्यरत महिलांमध्ये नेतृत्वगुण आणि उद्योजकीय क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न या योजनेमधून होणार आहे. पत्रकार फक्त बातम्या गोळा करणारा किंवा प्रसिद्ध करणारा नसून,तो आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबीही असावा,अशी भूमिका यामागे आहे.
मिशन महाराष्ट्र या उपक्रमातून महिलांना पत्रकारितेबरोबरच एक सक्षम उद्योजक बनवण्याचे उद्दिष्ट आहे. पत्रकारिता अधिक समाजाभिमुख व्हावी असा यामागे घ्येय आहे.
या संकल्पनेचा पहिला टप्पा सुरु झाला आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांतील १० महिलांची निवड करण्यात आली आहे.
या महिलांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या स्थानिक भागात भौगोलिक परिस्थिती,सामाजिक गरज,आर्थिक क्षमता यांचा विचार करून विविध लघुउद्योग,सेवा-व्यवसाय, उत्पादनाधिष्ठित उपक्रम सुरु करण्यात येणार आहेत.
हे उपक्रम म्हणजे केवळ व्यवसाय नसून, पत्रकारांसाठी पर्यायी आर्थिक स्रोत ठरतील. यातून निर्माण होणाऱ्या उत्पन्नाचा उपयोग त्यांच्या स्वतंत्र पत्रकारितेसाठी होईल. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे, समाजात बदल घडवणे आणि पत्रकारितेचा ध्यास टिकवणे – ही तीन उद्दिष्टे या योजनेमागे आहेत.
आज पत्रकारिता एका विचित्र संक्रमणातून जात आहे.
अनेक पत्रकारांना महिन्याला १५-२० हजार रुपयेही मिळत नाहीत. फ्रीलान्सच्या नावाखाली अनेकांना विनामूल्य काम करावे लागते.
स्थानिक दैनिक,साप्ताहिक,नियतकालिके,युट्युब माध्यमे यांना टिकून राहणे कठीण होत आहे. आर्थिक स्रोत नसल्यामुळे पत्रकारितेतील तत्वांशी तडजोड करावी लागते.
यातून पत्रकारांचे स्वातंत्र्य, निर्भयता आणि सामाजिक बांधिलकी संकटात आली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘मिशन महाराष्ट्र’ हे केवळ एक उपक्रम न राहता, पत्रकारितेच्या पुनरुज्जीवनाची चळवळ ठरू शकते.
संदीप काळे म्हणतात, “निर्भय पत्रकारिता करण्यासाठी आर्थिक स्वायत्तता आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला पत्रकार कोणाच्याही दबावाला बळी पडत नाही. त्याच्या हातात ‘सत्य’ मांडण्याचं बळ असतं. मिशन महाराष्ट्र ही संकल्पना हेच बळ देईल.”
या योजनेचा विस्तार करताना प्रत्येक टप्प्यावर नव्या नेतृत्वाची निर्मिती केली जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात महिला पत्रकारांचा सक्षम आर्थिक नेटवर्क तयार करून ‘स्वतंत्र पत्रकारिता’ला नवा आत्मा देण्याचे काम सुरु झाले आहे.
‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या पुढील कार्यक्रमांमध्ये या योजनेची झेप अधिक दूर आणि व्यापक केली जाणार आहे.
मिशन महाराष्ट्र ही संकल्पना म्हणजे हतबलतेच्या अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग आहे. पत्रकार फक्त चौथ्या स्तंभाचा एक घटक न राहता,समाजबांधणीचा आर्थिक आणि वैचारिक आधारस्तंभ बनू शकतो,हे या संकल्पनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
फोटो ओळ - व्हॉईस ऑफ मीडिया महिला पत्रकारांचे राज्य शिखर अधिवेशनच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.