सोलापूर : दि.२३ (एमडी२४न्यूज) महानगरपालिका हद्दीमध्ये नोटरी पध्दतीने खरेदी केलेल्या ३००० स्क्वेअर फुट जागेची कर आकारणीस नावाची नोंद करण्यासाठी ५० हजार रूपयांची लाच रक्कमेची मागणी करून २८,७४५ रुपये लाच रक्कम स्वरुपात स्वतः करीता स्वीकारल्याप्रकरणी वरिष्ठ मुख्य लेखनीक चंद्रकांत लक्ष्मण दोंतूल एसीबीच्या पथकानं रंगेहाथ पकडलंय. हा खळबळजनक प्रकार गुरूवारी सोलापूर महानगरपालिकेत घडलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,यातील तक्रारदाराने महानगरपालिका हद्दीत १९९२ मध्ये नोटरी पद्धतीने ३००० स्क्वेअर फिट जागा खरेदी केली होती. त्या जागेची महानगरपालिकेत नोंद करून करपावती घेण्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर अर्जदार त्या अर्जाचा पाठपुरावा करीत होते.
त्यासाठी अर्जदाराने सोलापूर महानगरपालिका कर आकारणी व कर संकलन विभागातील मुख्य वरिष्ठ लेखनिक चंद्रकांत लक्ष्मण दोंतुल, यांची भेट घेतली होती. त्यावेळी चंद्रकांत दोंतुल यांनी तक्रारदार यांना त्यांनी खरेदी केलेल्या जागेचा ०१ एप्रिल१९९२ पासुन ते ३१ मार्च २०२५ पावेतोचा कायदेशीर कर १,७७,७४५ रुपये भरण्यास सांगितले.
त्या पुढे जाऊन तेवढा कर भरायचा नसेल तर ५०,००० रुपये देण्यास सांगून, त्यामधून ०१ एप्रिल १९९२ ते ३१ मार्च २०२५ पावेतोचा कर भरल्याची पावती देतो, असे सांगून तक्रारदार यांच्याकडून ५०,००० रुपयांचा स्विकार केला. त्यापैकी २१,२५५ रुपयांची ऑनलाईन कर भरल्याची पावती तक्रारदार यांना देऊन उर्वरीत २८,७४५ रुपये लाच रक्कम स्वरुपात स्वतः करीता स्वीकारल्याप्रकरणी वरिष्ठ मुख्य लेखनीक चंद्रकांत लक्ष्मण दोंतूल एसीबीच्या पथकानं रंगेहाथ पकडलंय. पर्यवेक्षण अधिकारी म्हणून उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी काम पाहिलंय.
वरिष्ठ मुख्य लेखनीक चंद्रकांत दोंतूल ( रा. घर नंबर १०११ / १०१२ भाग्यनगर, प्रगती चौक, जुना विडी घरकुल सोलापूर) यांच्याविरूध्द सदर बझार पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
