Ticker

6/recent/ticker-posts

'मी सावित्री ज्योतिराव' ग्रंथातूनखरा इतिहास मांडला : मुरुमकर


                        मराठी भाषा संवर्धनात पुस्तक परिचय

सोलापूर : दि.२५ (प्रतिनिधी) मी सावित्री ज्योतिराव या चरित्र ग्रंथातून खरा मानवतावादी इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला असे प्रतिपादन या ग्रंथाच्या लेखिका डॉ.कविता मुरुमकर यांनी केले.
   
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त शुक्रवारी सायंकाळी महापालिकेने आयोजित केलेल्या पुस्तक परिचय कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशीष लोकरे यावेळी उपस्थित होते.
      
डॉ.मुरुमकर यांच्या 'मी सावित्री ज्योतिराव' या ग्रंथाला अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत. या ग्रंथाच्या निर्मितीमागची पार्श्वभूमी त्यांनी सांगीतली. सावित्रीबाई फुले यांनी स्रीयांच्या अवहेलनेविरुद्ध बंड केले. मुलींची शाळा सुरु केली. ज्योतीबा फुले,भिडे गुरुजी,मोरोपंत वाळवेकर,सदाशिव गोवंडे, वस्ताद लहुजी साळवे,फातीमा शेख यासारख्या अनेकांनी त्यांना या कामात मदत केली. त्याकाळातला हा खरा इतिहास माझ्या ग्रंथातून मांडला. फुलेंची विचारधारा वैश्विक स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचे मुरुमकर यांनी सांगितले. 
     
डॉ.श्रुती वडकबाळकर - यांनी 'अक्कमहादेवी'  या आपल्या चरित्रात्मक ग्रंथाची ओळख करुन दिली.
अक्कमहादेवी यांची मराठीतली पहिली कादंबरी आपण लिहिल्याचे सांगून त्या म्हणाल्या,बाराव्या शतकात अक्कमहादेवी यांनी जे धाडसी कार्य केले ते प्रेरणादायी आहे. घनदाट जंगलात राहून साधना केली. त्यांनी आपल्या वचनांतुन  स्रीयांचे प्रश्न मांडले. आठशे वर्षापूर्वी मांडलेले विचार आजच्या समाजालाही उपयुक्त आहेत. प्रत्येक महिलेकडे आई आणि मुलीच्या नजरेने पाहिले तर आज समाजात निर्माण होणारे प्रश्न नक्की सुटतील.
      
जेष्ठ पत्रकार रजनीश जोशी - यांनी जना मनातला माणूस निळू फुले या पुस्तकाविषयी भाष्य केले. निळू फुले चित्रपटात खलनायक असले तरी माणूस म्हणून मोठे होते. त्यांची भाषा आणि शैली मनाला भुरळ पाडणारी होती. अतिशय साधा माणूस पण नाटकात,चित्रपटात आणि घरी त्यांचे व्यक्तीमत्व वेगवेगळे होते. राजकारण गेल चुलीत, चोरीचा मामला,सामना,एक गाव बारा भानगडी यातील भुमिका मनात घर करुन राहिल्या. काही किस्सेदेखील जोशी यांनी सांगितले.
      
समीर गायकवाड - यांनी खुलूस हे आपले पुस्तक उलगडून दाखवले.  वेश्या व्यवसायावर असलेल्या या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. खुलुस हा तीन दशकांचा प्रवास आहे. कुंटणखान्यातील महिलांच्या व्यथा यामध्ये मांडल्या आहेत. सोलापुर, पुणे यासारख्या शहरात या महिलांच्या व्यथा ऐकुन त्या खुलूसमध्ये मांडल्या. समाज नजरेला झापड बांधुन या व्यथा नजरेआड करुन पुढे जातो याबद्दलची खंत त्यांनी व्यक्त केली. समाज म्हणून आपण बधीर आहोत. अशा महिलांना सन्मान देता आला नाही तर किमान माणुस म्हणून तरी वागवा अशी अपेक्षा व्यक्त केली.
     
सरफराज अहमद - यांनी 'अमीर खुसरो दारा शकोह प्रवास एका इतिहासाचा' या आपल्या पुस्तकावर विवेचन केले. आमीर खुसरो भारताच्या इतिहासातील महत्त्वाचे नाव आहे. भारतातील वेगवेगळ्या भाषा एकत्र करुन त्यांनी हिंदवी भाषा निर्माण केली. त्या भाषेत लेखन केले. तीस चाळीस भाषेतले शब्द घेतले. जे पुढे शिवाजी महाराजांनीही वापरले. भारत माणसांचा देश आहे. माणसाच्या भिंती नको हे त्यांचे तत्त्वज्ञान आजही लागू पडते. दारा शकोह यांचे संस्कृतमधील लेखन मोलाचे आहे. इब्राहिम आदीलशा यांनी कर्नाटकात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला. मोघलांच्या जनानखान्यावर लिहिले. त्यामागचा अर्थ सरफराज यांनी स्पष्ट केला.
      
प्रारंभी दैनिक संचारचे मुख्य उपसंपादक प्रशांत जोशी यांनी प्रास्ताविक केले. अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी सर्व साहित्यीकांचा सत्कार केला. उपायुक्त आशीष लोकरे यांनी आभार मानले. उद्या शनिवारी सकाळी सहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात सानिका आणि रसीका या कुलकर्णी भगीनी गीत रामायण सादर करणार आहेत.
     
यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहकुलसचिव डॉ.शिवाजी शिंदे,मसाप जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी,मसाप दक्षिण सोलापूरचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे,महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे,कवी मारुती कटकधोंड, गिरीश दुनाखे,रामचंद्र धर्मसाले,प्रशांंत देशपांडे उपस्थित होते.