महापालिकेच्या वतीने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन
सोलापूर : मराठी भाषा ही माणसे जोडणारी भाषा आहे. या मराठी भाषेचा समृद्ध वारसा सर्वांनी जपला पाहिजे. सोलापूर शहराची एक वैशिष्टय़पूर्ण भाषा शैली आहे. या शैली मध्ये काव्य, कादंबरी निर्माण होणे महत्वाचे आहे. त्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे जेष्ठ अभ्यासक डॉ.अप्पासाहेब पुजारी यांनी केले.
सोलापूर महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषद,जुळे सोलापूर, महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरिय शाखा,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,महापालिका पत्रकार संघ यांच्या सहकार्याने 20 ते 30 जानेवारी 2025 पर्यंत आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथील डॉ.द्वारकानाथ कोटणीस स्मारक येथे संत साहित्याचे जेष्ठ अभ्यासक डॉ.अप्पासाहेब पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,उपायुक्त आशिष लोकरे,सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले,सहाय्यक आयुक्त अनिता मगर,नगर अभियंता सारिका अकुलवार,मसाप जुळे सोलापूर अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी,कार्यवाह गिरीश दुनाखे,मसाप दक्षिण सोलापूर कार्याध्यक्ष प्रशांत बडवे,अ.भा.मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा अध्यक्ष विजय साळुंखे,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सहकुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे,ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी,महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.अप्पासाहेब पुजारी पुढे म्हणाले,सोलापूरचे सुपुत्र डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांनी महायुद्ध काळात चीनमध्ये वैद्यकीय सेवा बजावली. त्यांच्या कार्याचा जगभरात नावलौकिक आहे. यामुळे सध्या त्यांच्या कार्याची महती जगभरात पोहोचविण्यासाठी माझे सर्वतोपरी सहकार्य राहील. सोलापूर शहराची एक वैशिष्टय़ पूर्ण भाषा शैली आहे.या शैली मध्ये काव्य,कादंबरी निर्माण होणे महत्वाचे आहे. त्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहे. लेकराचे कपाळ आईच्या ह्रदयाला बिलगते तेव्हा दोघे एक होतात.
यावेळी डॉ. पुजारी यांनी आपल्या कादंबरीतील प्रसंग दाखले देत अनेक साहित्यिक मूल्याची माहिती दिली. कन्नड भाषिक असून देखील मान दिल्या बद्दल सर्वांचे आभार मानले.
अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे म्हणाले,मराठी भाषा ही समृद्ध अशी भाषा आहे. प्रत्येकाच्या मनात आणि घराघरात ती जपली पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविक भाषणात उपायुक्त आशिष लोकरे यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा उद्देश स्पष्ट केला. विविध संस्थांच्या सहकार्यातून महापालिकेच्या वतीने शहरात असा उपक्रम प्रथमच आयोजित करण्यात येत आहे. या पंधरवड्यात विविध कार्यक्रमांची रेलचेल आणि वैचारिक पर्वणी सर्वांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापक अमोल भोसले यांनी करून दिला. सहकुलसचिव डॉ.शिवाजी शिंदे यांनी आभार मानले. यावेळी महापालिकेतील विविध विभागाचे विभाग प्रमुख,अधिकारी,कर्मचारी नागरिकांनी,साहित्य प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
