Ticker

6/recent/ticker-posts

महापालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ग्रंथदिंडी


मराठी भाषेचा वारसा पुढे नेण्याचा दिला  संदेश 

विविध शाळांमधील 400 विद्यार्थ्यांचा सहभाग 

सोलापूर :  मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उद्घाटना निमित्त काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीने "माझ्या मराठी मातीचा,लावा ललाटास टिळा,हिच्या संगे जागतील,मायदेशांतील शिळा" मराठी भाषेचा वारसा पुढे नेऊया हा संदेश दिला. ढोल ताशाच्या गजरात मराठमोळ्या वेशभूषेत मराठी संस्कृतीचे दर्शन याद्वारे घडविण्यात आले.
          
सोलापूर महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषद,जुळे सोलापूर, महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरिय शाखा,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, महापालिका पत्रकार संघ यांच्या सहकार्याने दि. 20 जानेवारी ते 30 जानेवारी 2025 पर्यंत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या पंधरवड्याच्या उदघाटनापूर्वी आज सायंकाळी सोलापूर महानगरपालिकेपासून ते डॉ.द्वारकानाथ कोटणीस स्मारक पर्यंत ग्रंथ दिंडी उत्साहात काढण्यात आली. प्रारंभी महपालिकेत ग्रंथ पूजन करण्यात आले. 






अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या ग्रंथ दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. या पालखीतमध्ये भारतीय संविधान,ज्ञानेश्वरी,भगवद्ग गीता आदी ग्रंथ ठेवण्यात आले होते. सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी खांद्यावर ही ग्रंथपालखी घेतली. याप्रसंगी उपायुक्त तैमूर मुलानी,  महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, नगर रचना सहसंचालक मनीष भिष्णूरकर,सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक रजाक पेंढारी,मसाप जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी,महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे,उद्यान अधीक्षक किरण जगदाळे, कामगार कल्याण जनसंपर्क अधिकारी ओमप्रकाश वाघमारे,पर्यावरण व्यवस्थापक स्वप्निल सोलनकर, महापालिका शाळा पर्यवेक्षक संतोष बुलबुले आदींसह अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. 
      
त्यानंतर ही ग्रंथ दिंडी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुढे मार्गस्थ झाली. त्यानंतर डफरीन चौक मार्गे रेल्वे स्टेशन येथे महात्मा गांधी आणि पुढे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या  पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक येथे या ग्रंथ दिंडीचा समारोप झाला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही ग्रंथदिंडी काढण्यात आली. 
      
या ग्रंथदिंडीमध्ये हरिभाई देवकरण प्रशाला, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, सेवासदन प्रशाला आदी शाळांचे सुमारे 400 विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते. या दिंडीमध्ये पर्यवेक्षक हनुमंत मोतीबने,गणेश नेवरे,महारुद्र कत्ते,शिक्षिका प्रवीणा जोशी,तृप्ती कंगळे,अक्षता केळेकर,जयश्री पवार, वर्धा माळगे,प्रियांका लाड आदींसह शिक्षक,विद्यार्थी ,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.