Ticker

6/recent/ticker-posts

अभावग्रस्त,कष्टकरी लोकांना पाहून लिहायला लागलो

प्रकट मुलाखतीत माजी कुलगुरू डॉ.इरेश स्वामी यांनी उलगडला जीवनप्रवास 

महापालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 

सोलापूर : दि.२३ (एमडी२४न्यूज) गरीबीत आणि दुःखात आनंद उपभोगणारी माणसे मी पाहिली. अभावग्रस्त जीवन मी पाहिले. अभावग्रस्त,प्रामाणिक आणि कष्टकरी लोकांना पाहून मी लिहायला लागलो. मराठी भाषेबद्दल मला आतून ओढ होती. मराठी भाषा ही सुलभ आणि समृद्ध अशी भाषा आहे. भाषेच्या दृष्टीने विशालता आली पाहिजे, असे विचार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ.इरेश स्वामी यांनी मांडले.
           
सोलापूर महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली -उगले यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली  सोलापूर महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषद, जुळे सोलापूर, महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरिय शाखा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,  महापालिका पत्रकार संघ यांच्या सहकार्याने 20  ते 30 जानेवारी 2025 पर्यंत आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत आज इंद्रभुवन इमारतीच्या मागील बाजूस गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजता महापालिका आवारातील इंद्रभुवन इमारतीच्या मागील बाजूस खुल्या जागेत गुरुवारी  सायंकाळी  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ.इरेश स्वामी यांची मुलाखत घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी  महापालिका उपायुक्त आशिष लोकरे,सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. 
        
यावेळी माजी कुलगुरू डॉ.इरेश स्वामी याचं सत्कार उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी केले.बालपणीपासून ते आत्तापर्यंतचा आपला जीवन प्रवास मांडला. महाविद्यालयीन ते पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कुलगुरू या कार्यकाळातील आपल्या विविध घटना आणि आठवणींना उजाळा दिला. विविध प्रश्नांच्या उत्तरात ते पुढे म्हणाले,  तत्कालीन कथा स्पर्धेच्या निमित्ताने मी लिहिण्यास सुरुवात केली. अभावग्रस्त जीवन मी जगलो. जे अनुभवले, जे पाहिले ते लिहिले पाहिजे याच उद्देशातून लिहीत राहिलो. गरिबांना दिवाळीसह इतर सण का येतात असा प्रश्न भेडसावतो. या सणांमुळे त्यांच्या दुःखांना डागण्या दिल्यासारखे होते. गरिबी आणि दुःखात आनंद उपभोगणारी माणसे पाहिली. ती प्रामाणिक आणि कष्टकरी असतात. अशाच लोकांना पाहून मी लिहायला लागलो. मराठी भाषेबद्दल मला आतून ओढ होती. मराठी ही भाषा सुलभ असल्याचे मी अनुभवले.
      
विविध दिग्गज साहित्यिकांचे साहित्य वाचत असताना माझ्या प्रांतातील पात्रे मला दिसत होती. अनुशासनाची पद्धत गुरूंकडून  शिकलो. ध्येयवादी अनुशासन प्रिय गुरूकडून खूप काही शिकता आले. संगमेश्वर महाविद्यालयात ते संस्कार मला मिळाले. शिक्षक हे आपले आदर्श असतात. ते आयुष्य शिकवतात. ज्येष्ठ साहित्यिक (स्व) डॉ.निर्मलकुमर फडकुले यांनी मला लिहायला प्रवृत्त केले. "हिरवी अक्षरे" यासह मी पुस्तके लिहिली असे डॉ.स्वामी यांनी सांगितले. 
        
महात्मा बसवेश्वर यांचे साहित्य कन्नड मधून मराठीत अनुवाद करण्याचा अनुभव कथन करताना डॉ.स्वामी म्हणाले, महात्मा बसवेश्वर यांचा क्रांतिकरक म्हणून उल्लेख केला जातो. त्यांनी वचन साहित्य लिहिले. वचन साहित्यात आचरण, विचार मांडले. मार्क्सच्या विचारांचे मूळ महात्मा बसवेश्वरांच्या वचन साहित्यात आहे.
       
विद्यापीठाचे कुलगुरू हे पद अनपेक्षित होते. त्यावेळी कोल्हापुरातील विद्यापीठात जाणे सोलापुरातील लोकांना, विद्यार्थ्यांना अडचणीचे ठरत होते. अशा परिस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली. सोलापूर विद्यापीठाची निर्मिती हे एक धाडस होते, ते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकमार शिंदे यांनी केले.सुरुवातीला निधी कमी होता. त्यासाठी प्रयत्न केला, असेही डॉ. स्वामी यांनी सांगितले.
             
या मुलाखतीचे सूत्रसंचालन प्रा.नानासाहेब गव्हाणे,प्रा.डॉ. सारीपुत्र तुपेरे,प्रा.देविदास गायकवाड यांनी केले. प्रारंभी उपायुक्त तैमूर मुलानी यांच्या हस्ते डॉ.स्वामी यांचा सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शन प्रशांत बडवे यांनी केले. याप्रसंगी  मसाप जुळे सोलापूर अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, कार्यवाह गिरीश दुनाखे,मसाप दक्षिण सोलापूर कार्याध्यक्ष प्रशांत बडवे,अ.भा.मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा अध्यक्ष विजय साळुंखे,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सहकुलसचिव डॉ.शिवाजी शिंदे,दैनिक संचारचे वरिष्ठ उपसंपादक प्रशांत जोशी,महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे आदींसह यावेळी महापालिकेतील विविध विभागाचे विभाग प्रमुख,अधिकारी , कर्मचारी नागरिकांनी,साहित्य प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट - एकमेकांमधील संवादातूनच विकास होतो. मराठी भाषा ही समृद्ध भाषा आहे असे सांगताना डॉ.स्वामी पुढे म्हणाले,दुसऱ्याचे हित पाहणारा माणूस धर्म महत्त्वाचा आहे. अभ्यासकांनी भाषेबद्दल दु:श्वास करू नये. भाषेच्या विद्यार्थ्यांनी शब्दकोश ठेवला पाहिजे. त्यामुळे अभिव्यक्ती वाढते. भाषेच्या दृष्टीने विशालता आली पाहिजे. विविध भाषेतील शब्द आपल्या भाषेत घेतले पाहिजेत तर ती समृद्ध होते. भाषेचे दरवाजे उघडी ठेवली पाहिजेत. एकमेकांमधील संवाद झाला पाहिजे. त्यातूनच विकास होतो,असेही यावेळी डॉ. स्वामी यांनी सांगितले.