Ticker

6/recent/ticker-posts

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या...


मुंबई : दि.१३ (एमडी२४न्यूज)  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळं राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसंच Y दर्जाची सुरक्षा असतानाही सिद्दीकींवर तीन जणांंनी हल्ला केला. त्यामुळं राजकीय नेत्यांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.



बाबा सिद्दिकी हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते होते. तसेच आमदार झीशान सिद्दिकी यांचे ते पिता होते. आमदार झीशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेरच तीन अज्ञात हल्लेखोरांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात त्यांना तीन गोळ्या लागल्या आहेत. एक गोळी छातीत लागली. तर त्यांच्या सहकार्याच्या पायाला ही एक गोळी लागली आहे. जखमी अवस्थेत बाबा सिद्दिकी यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. हल्लेखोर अज्ञात आहेत. मात्र हा हल्ला झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या वादातून झाल्याची प्राथमिक चर्चा आहे.


अजित पवार काय म्हणाले?  - "राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री,विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचे निधन झाल्याचे समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी,मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी राज्यमंत्री बाबत सिद्दिकी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली. "या घटनेची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागच्या सूत्रधारही शोधण्यात येईल," असेही अजित पवार म्हणाले. "बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्यांक बांधवांसाठी लढणारा,सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला आहे. त्यांचे निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नुकसान आहे. झीशान सिद्दीकी,सिद्दीकी कुटुंबिय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे," असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.