डॉ.वै.स्मृ.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,सोलापूर येथे प्रमुख जिल्हा न्यायाधीश आझमी यांच्या हस्ते विधी सेवा चिकीत्सालयाचे उदघाटन
सोलापूर: दि.१३ (एमडी२४न्यूज) राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून गोरगरीब व अन्यायग्रस्त व्यक्तींना विशेषः महिला व बालकांना मोफत विधी सेवा व सल्ला दिला जातो. परंतू एखाद्या वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयात अशा प्रकारचे विधी सेवा चिकीत्सालय सुरु करणारे महाराष्ट्रातील पहिले डॉ.वै.स्मृ.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर हे ठरले आहे. हे विधी सेवा चिकीत्सालय जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश मोहम्मद सलीम आझमी यांच्या मान्यतेने व डॉ.वै.स्मृ.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आले.
डॉ.वै.स्मृ.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या मजल्यावर विकृतीशास्त्र विभागा शेजारी विधी सेवा चिकीत्सालय कक्षाचे उदघाटन दि.११ ऑक्टोबर शुक्रवार रोजी प्रमुख जिल्हा न्यायाधीश आझमी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश देवर्षी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना,विधी सेवा चिकीत्सालयाची सेवा वैद्यकीय महाविद्यालयात दर शुक्रवारी सकाळी ११.०० ते ०२.०० या वेळेत दिली जाणार असल्याचे नमुद केले.
अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांनी विधी सेवा चिकीत्सालय वैद्यकीय महाविद्यालयात सुरु केल्याबददल विधी प्राधिकरणाचे आभार व्यक्त केले व न्यायाधीशांना कामकाजामध्ये येणाऱ्या मानसिक ताण तणाव यावर मार्गदर्शन केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधिश आझमी यांनी अशा प्रकारचे विधी सेवा चिकीत्सालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरु करण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना असल्याचे नमुद करुन महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अन्याय व त्रासा बददल येथे सल्ला व सेवा पुरविली जाणार असल्याने महिला सबलीकरण व कामाच्या ठिकाणी सुरक्षीत वातावरण मिळेल असे सांगून सदर उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश कटारीया,खुने,राणे,मुख्य न्यायदंडाधिकारी भंडारी,जिल्हा सरकारी वकील रजपूत, महाराष्ट्र व गोवा बार काउंसिल सदस्य मिलींद थोबडे, सोलापूर जि.बार असोसिएशन उपअध्यक्ष शिंदे व सचिव पामुल,किणगी,उपाधिष्ठाता डॉ.जयकर, डॉ.झंजाड, डॉ. बनसोडे,वैद्यकीय अधिक्षक डॉ.संपत्ती तोडकर,डॉ.औदुंबर मस्के,डॉ.राजेश चौगुले,डॉ.अग्रजा चिटणीस,डॉ.सुहास सरवदे व जिल्हा न्यायालयाचे आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.जयश्री खिस्ते यांनी केले. तर आभार प्रदर्शन विशाखा समिती अध्यक्ष डॉ.दंतकाळे यांनी मानले.