विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांना संधी द्या: अन्यथा महाविकास आघाडीने आमची मते गृहीत धरू नये,इनामदार यांचा इशारा
पुणे : दि.१९ (एमडी२४न्यूज) महाविकास आघाडी सर्व घटकांना व समाजाला जाती आधारित न्याय देते. पण मुस्लिमांना प्रतिनिधित्व देताना त्यांना आजही भीती वाटते. त्यांनी लोकसभा निवडणुकीतही एकाही मुस्लिम व्यक्तीला उमेदवारी दिली नाही. त्यांनी विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती केली तर,त्यांनी मुस्लिमांचे मते गृहीत धरू नये, असा इशारा मुस्लिम राजकीय मंचाचे नेते अंजुम इनामदार यांनी दिला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर अंजुम इनामदार यांनी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीला उपरोक्त इशारा दिला आहे. यावेळी माजी नगरसेवक आयुब शेख,मुस्लिम धर्मगुरू मौलाना निजामुद्दीन,कारी इद्रिस अन्सारी, मौलाना रझीन अश्रफ बबलू सय्यद, एडवोकेट दानिश पटेल,सादिक लुकडे, इब्राहिम यवतमाळ वाला आधी मान्यवर उपस्थित होते.
अंजूम इनामदार म्हणाले,महाविकास आघाडीत काम करणाऱ्या अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी उमेदवारीची मागणी केली. पण त्यांची दखल घेतली गेली नाही. त्यानंतरही महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाने भरभरून महाविकास आघाडीला मतदान दिले. त्याचा परिणाम महाराष्ट्रात दिसून आला. मागच्या तुलनेत यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार जास्त निवडून आले. त्यानंतर काही दिवसांनी विधान परिषदेच्या दोन जागा रिक्त झाल्या. त्या ठिकाणी पुन्हा मुस्लिमांना संधी दिली पाहिजे होती. मात्र तिथेही उमेदवारी न देऊन मुस्लिम समाजावर अन्याय केला.
लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला निवडून आणण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांना विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांना सत्तेत भागीदारी मिळण्याची आशा होती. मात्र आज रोजी तरी हे समाजाला न्याय देतील असे दिसून येत नाही. याविषयी पुणे शहरातील राज्य पातळीवर काम करणाऱ्या २० हून अधिक संघटना, मुस्लिम धर्मगुरू,शैक्षणिक क्षेत्रात, उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांची एक चिंतन बैठक झाली. त्या बैठकीत सर्वानुमते पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघापैकी किमान २ विधानसभा मतदारसंघात मुस्लिमांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली. ४० वर्षापूर्वी अमिनुद्दीन पेनवाले हे एक आमदार पुण्यातील निवडून गेले होते. त्यानंतर कोणतीही संधी पुण्यातील मुस्लिम समाजाला मिळाली नाही. असा आरोप अंजुम इनामदार यांनी यावेळी केला.