बोरामणी विमानतळ विकासात वनजमिनीचा अडथळा दिशाभूल करणारा
सोलापूर : दि.११. (प्रतिनिधी) बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा चालू ठेवून होटगी रोड विमानतळाच्या 15 नंबर धावपट्टीवरून उडाण (रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम) योजनेतून 27 आसनी हेलिकॉप्टरची तत्काळ सेवा सुरू व्हावी यासाठी सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी इच्छाशक्ती दाखवावी, अशी मागणी बोरामणी विमानतळ विकास व श्री सिध्देश्वर साखर कारखाना बचाव समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केली आहे. बोरामणी विमानतळाच्या विकासात वनजमिनीचा अडथळा असल्याची माहिती ही दिशाभूल करणारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सोमवारी,डफरीन चौकातील ‘गंगा निवास’ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोरामणी विमानतळाचा विकास आणि होटगी विमानतळावरून हेलिकॉप्टरची सेवा सुरू होण्यासंबंधीची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
यावेळी काडादी म्हणाले,डायरेक्टर ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या निर्णयानुसार गेल्या आठवड्यात एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडिया मुंबई कार्यालयातील डेप्युटी जनरल मॅनेजर मग्गीवार आणि होटगी रोड विमानतळ अधिकारी चांपला हे विमानतळसेवेत येणार्या अडथळ्यांचा सर्व्हे करण्यासाठी कारखान्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या सूचनेनुसार होटगी रोड विमानतळाच्या जागेच्या मर्यादा लक्षात घेता बोरामणी विमानतळाचा विकास होणे गरजेचे आहे. जोपर्यंत बोरामणी विमानतळ सुरू होत नाही तोपर्यंत उत्तर भारतातील सिमला,चंदीगड भागामध्ये चालतात तशी 27 आसनी हेलिकॉप्टरची सेवा होटगी रोड विमानतळावरून चालू करता येईल. सोलापुरातून हैदराबाद,बंगळुरू,मुंबई, शिर्डी, तिरूपती,गोवा या शहरांसाठी ही सेवा चालू केली तर ती फायदेशीर होईल. यासंबंधीचा प्रस्ताव सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी केंद्र आणि राज्य सरकारकडे मांडावा आणि उडान योजनेतून ही सेवा चालू व्हावी,अशी मागणी काडादी यांनी केली.
बोरामणी विमानतळाच्या विकासासाठी राज्य सरकारने 550 हेक्टर जमीन संपादित केली आहे. - त्यासाठी निधीही दिला आहे. विमानतळाच्या विकासात वनजमीन व माळढोक पक्षी दिसल्याची माहिती चुकीच्या आधारे पुढे आणून सोलापूरच्या विकासात काही मंडळींकडून अडथळे आणले जात आहेत. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने 2010 पासून आजपर्यंत 579.25 हेक्टर क्षेत्र भूसंपादन करण्यासाठी 122.79 कोटी रुपये खर्च केले आहेत.
गायरान जमिनीच्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाधिकार्यांना - असल्यामुळे बोरामणी विमानतळाच्या विकासात कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये. या सर्व बाबींचा विचार करता बोरामणी विमानतळाच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी इच्छाशक्ती दाखवावी आणि होटगी रोडवरून हेलिकॉप्टरची सेवा सुरू व्हावी अशी मागणी काडादी यांनी केली आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेऊन - होटगी रोड विमानतळावरून 27 आसनी हेलिकॉप्टरची सेवा उडान योजनेतून सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली असल्याचे काडादी यांनी सांगितले. या मागणीसाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचीही भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे काडादी म्हणाले. होटगी रोड विमानतळाच्या 33 नंबर धावपट्टीवरून विमानसेवा सुरू करण्यासाठी 106 अडथळे असल्याचा अहवाल सर्व्हे करणार्या अधिकार्यांनी दिला आहे. तसे असताना केवळ सिध्देश्वर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा पुढे केला जातो. यातील काही लोक नोटीस घेण्यासही तयार नाहीत, असे काडादी यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस - बोरामणी विमानतळ विकास आणि सिध्देश्वर कारखाना बचाव समितीचे अॅड.रा.गो.म्हेत्रस,राजू चव्हाण,डॉ.रावसाहेब पाटील,दत्ता थोरे,दिनेश शिंदे,सिध्देश्वर कल्याणशेट्टी,अशोक बिराजदार,हरीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
चौकट - ती वनजमीन नव्हेच बोरामणी विमानतळाच्या विकासात वनजमिनीचा अडथळा असल्याची दिशाभूल केली जाते. प्रत्यक्षात येथील गट क्रमांक 569 मधील 13.60 हेक्टर जमीन 1987 मध्ये डीस्फॉरेस्ट करून जिल्हाधिकारी यांनी ती जमीन रामचंद्र मांग यांना दिली आहे. 1968 मध्ये गट क्रमांक 574 या क्षेत्रातील 107.21 हेक्टर भूसंपादन करून ती बोरामणी ग्रामपंचायतीला मोफत ग्रेजींग (गायरान)साठी राखीव ठेवण्यात आली आहे. या क्षेत्रापैकी 1 एकर जमीन 2015 मध्ये जिल्हाधिकारी यांनी सोलापूर-हैदराबाद या महामार्गासाठी दिली आहे.
चौकट - माळढोक दिसल्याचा पुरावा नाही
बोरामणी आणि तांदूळवाडी येथील वनजमीन माळढोकसाठी आरक्षित नाही. नान्नज अभयारण्यापासून बोरामणी विमानतळ या दरम्यानचे अंतर 30 ते 35 किलोमीटर आहे. यामध्ये कुठेही माळढोक दिसल्याचे पुरावे व नोंदी नाहीत. केवळ माळढोक दिसल्याच्या खोट्या आणि दिशाभूल करणार्या माहितीच्या आधारे बोरामणी विमानतळाचा विकास रोखणे हे अयोग्य असल्याचे धर्मराज काडादी म्हणाले.