Ticker

6/recent/ticker-posts

पावसात केली गणेश विसर्जन व मिरवणूक मार्गाची पाहणी पि.शिवशंकर महापालिका आयुक्त

आपापल्या घरीच पर्यावरण पूरक श्री गणेश विसर्जन करावे !

सोलापूर : दि.०८ (प्रतिनिधी) सोलापूर शहरात श्री गणेश विसर्जनासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. या निमित्ताने कृत्रिम कुंड , मूर्ती संकलन केंद्र तसेच मिरवणूक मार्गाची महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांनी भर पावसात पाहणी केली. 
       
सोलापूर शहरात शुक्रवारी श्री गणेश विसर्जन होणार आहे. अनंत चतुर्थीच्या पूर्वसंध्येला महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत विविध ठिकाणी पाहणी केली. सोलापूर शहरात श्री गणेश विसर्जन करण्यासाठी महापालिकेने विविध 12 ठिकाणी कृत्रिम कुंड आणि  84 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उपलब्ध करण्यात आले आहेत. यातील काही ठिकाणांची ही महापालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली. दत्त चौक नजीकच्या गणपती घाट व श्री सिद्धेश्वर तलाव परिसराची पाहणी केली. निर्माल्य ठेवण्यासाठीची व्यवस्था या संदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या.
   

श्री गणेश विसर्जन  मिरवणूक मार्गाचीही त्यांनी पाहणी केली.दरम्यान,  दत्त चौक, नवी पेठ , पत्रा तालीम यासह विविध मार्गाची त्यांनी पाहणी केली. मार्गावरील रस्ते, लाईटची व्यवस्था याचीही पाहणी करून आवश्यकता सूचना दिल्या.
      
नागरिकांनी आपापल्या घरीच शक्यतो पर्यावरण पूरक श्री गणेश विसर्जन करावे तसेच सार्वजनिक मंडळांनी संकलन केंद्रावर श्री गणेश मूर्ती द्याव्यात. सर्व सर्वोच्च न्यायालय आणि पर्यावरण प्राधिकरणाच्या आदेशानुसार तलावामध्ये मूर्ती विसर्जन करता येणार नाही. त्याचबरोबर तीन फुटांवरील उंचीच्या श्री गणेश मूर्ती खाणीपर्यंत मंडळांनी आणून द्याव्यात. पर्यावरण पूरक श्री गणेश विसर्जनासाठी सर्व मंडळांनी महापालिकेला सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे.

दरम्यान, तीन फुटावरील गणेशोत्सव मूर्ती असलेल्या ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वाहन वाहतूक अडचण असल्याने खाणीपर्यंत येणे शक्य नाही. त्यांच्यासाठी महापालिकेच्या वतीने तेथील मूर्ती संकलन करून तुळजापूर रोडवरील खाण येथे  आणून विसर्जन करण्याची  व्यवस्था करण्यात येईल असे महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांनी स्पष्ट केले आहे.

तुळजापूर रोडवरील खाण येथे अशी आहे व्यवस्था !
  
तुळजापूर रोडवरील खाणीमध्ये संकलित केलेल्या मुर्त्यांचे विसर्जन करण्याकरिता महापालिकेच्या वतीने नेटकी व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणाची ही महापालिका आयुक्तांनी पाहणी केली. आवश्यकता सूचना दिल्या.  तुळजापूर रोडवरील या खाण परिसरात लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी महापालिकेचे 30 कर्मचारी व अधिकाऱ्यांचे पथक दोन शिफ्ट मध्ये तैनात राहणार आहे. सुमारे सात अभियंतेही उपस्थित राहणार आहेत. सकाळी 9 ते 5 व सायंकाळी 5 ते रात्री 12 पर्यंत या दोन शिफ्ट मध्ये कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. दोन क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. आत आणि बाहेर जाण्याकरिता  दोन मार्ग ठेवले आहेत. पोलीस व महापालिका पथकासाठी मंच तयार करण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याची ही व्यवस्था करण्यात आली आहे.  वाहतुकीसाठी 70 गाड्या तैनात राहणार आहेत तसेच महापालिकेचे सहाशे कर्मचारी कार्यरत राहणार आहेत त्याचबरोबर मक्तेदाराकडून एका दिवसासाठी 400 कामगार उपलब्ध करून घेण्यात येणार आहेत असेही महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांनी सांगितले.
     
या पाहणीवेळी नगर अभियंता संदीप कारंजे, उपअभियंता एस.एम.आवताडे,कनिष्ठ अभियंता अभिजीत बिराजदार,अभियंता महादेव इंगळे, किशोर पक्केवाले यांच्यासह महापालिका अधिकारी उपस्थित होते.