Ticker

6/recent/ticker-posts

...जिल्ह्यात सेवा पंधरवड्याचा शुभारंभ

नागरिकांनी प्रलंबित अर्जासाठी सेवा पंधरवड्याचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन 
             
सोलापूर : दि.१७ (प्रतिनिधी)  राज्य शासनाकडून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने नागरिकांनी 10 सप्टेंबरपर्यंत प्रलंबित अर्जासाठी सेवा पंधरवड्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.


             
जिल्हाधिकारी कार्यालय येथील बहुउद्देशीय सभागृहात  आज या अभियानाचा शुभारंभ श्री शंभरकर यांच्या हस्ते  करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, अन्न धान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे,दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अमोल कुंभार,तहसीलदार दत्तात्रय मोहोळे, उत्तर व दक्षिण तहसिल कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
             

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, 10 सप्टेंबर 2022 पर्यंत प्रलंबित असलेल्या अर्जावर या सेवा पंधरवड्यामध्ये योग्य तो निर्णय होऊन नागरिकांना विविध प्रकारचे दाखले, 7/12 उतारे,फेरफार उतारे, रेशनकार्ड इत्यादी गोष्टींचा प्रशासनाकडून लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल. जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या प्रलंबित अर्जासंदर्भात संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून या सेवा पंधरवड्याचा लाभ घ्यावा.
         

याप्रसंगी प्रातिनिधीक स्वरूपात दक्षिण तहसिल कार्यालयाकडून 10 उतारे, 8 रेशनकार्ड तर उत्तर तहसिल कार्यालयाकडून 13 उतारे, 7 रेशनकार्ड असे एकूण 23 7/12, फेरफार व 15 रेशनकार्डचे वाटप शंभरकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी केले तर सूत्रसंचालन तहसिलदार अमोल कुंभार यांनी केले.