Ticker

6/recent/ticker-posts

मनपा आयुक्तवर पुन्हा भ्रष्टाचाराचे आरोप - भाजपाच्या माजी नगरसेवकांनी दिली पोलिसात तक्रार

आयुक्त संपर्क क्षेत्राच्या बाहेर - आलेली तक्रार मंत्रालयाला पाठवू पोलीस निरीक्षकांचे मत

चंद्रपूर : दि.१४ (प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्था ह्या भ्रष्टाचाराचे कुरण असल्याचे बोलल्या जाते. बरेचदा सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होतात मात्र पुढे आरोप करणारे व होणारे आरोप कुठे जातात कुणालाही कळत नाही त्यामुळे ह्या कुराणातील चारा कधीही संपत नाही. मागील काळात जगभरात कोरोनाचा थैमान सुरू असताना शासनाने स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांना आर्थिक व्यवहाराचे स्वातंत्र्य दिले होते. ह्या स्वांतंत्र्याचा गैरफायदा घेत चंद्रपूर मनपा आयुक्त राजेश मोहिते ह्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा आरोप नव्हे तर थेट पोलिस तक्रार तत्कालीन भाजपा नगरसेवकांनी माजी उपमहापौर राहुल पावडे ह्यांच्या नेतृत्वात केली आहे.

काही दिवसांपुर्वी आयुक्त राजेश मोहिते ह्यांच्यावर मराठवाड्यातील एकाने 14 लाखांच्या अपहाराची तक्रार केल्याची ध्वनिफीत व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. त्या व्यक्तीने आपले पैसे परत घेण्यासाठी चक्क आयुक्त कार्यालयात स्वतः वार चाकू हल्ला करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचीही गरमागरम चर्चा होती. पुढे हे प्रकरण पद्धतशीरपणे दडपण्यात आल्याचे चित्र निर्माण झाले मात्र आता पुन्हा एकदा मनपा आयुक्त भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकले आहेत.



महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी मागील अडीच वर्षात केलेल्या गैरकारभाराची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार माजी महापौर राखी कंचर्लावार, माजी उपमहापौर राहुल पावडे यांच्यासह आठ जणांनी शहर पोलीस ठाण्यात केली आहे. कोरोनाकाळात खर्चाचे सर्व अधिकार आयुक्तांकडे होते. त्याचा फायदा घेत आयुक्त राजेश मोहिते यांनी डब्बे घोटाळा केल्याचा आरोप सातत्याने होत आला आहे. अवैध बांधकामाची प्रकरणे, विकासकामांच्या निविदातील घोटाळा यासह अन्य कामात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप या तक्रारीतून करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी माजी महापौर राखी कंचर्लावार,माजी उपमहापौर राहुल पावडे,संजय कंचर्लावार यांच्यासह काही निवडक पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्रामभवनात तातडीची बैठक झाली. त्यानंतर रात्री उशिरा राजेश मोहिते यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. मोहिते यांच्याविरुद्ध तक्रार केली असल्याच्या वृत्ताला ठाणेदार सुधाकर आंभोरे तसेच राहुल पावडे यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, या प्रकरणी आयुक्त राजेश मोहिते यांच्याशी काल व आजही वारंवार संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असल्याचे संदेश येत होते. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मोहिते हे वरिष्ठ अधिकारी असल्याने त्यांच्याविरुद्ध आम्ही कारवाई करू शकत नाही. त्यांच्यावरील कथित आरोपाची एखाद्या चौकशी समितीमार्फत चौकशी करावी. त्या समितीचा अहवाल आल्यानंतर कारवाई करता येईल. राहुल पावडे यांच्यासह अन्य काही जणांनी मोहिते यांच्याविरोधात तक्रार दिली. आणि आम्ही ती ठेवून घेतली. ही तक्रार मंत्रालयाकडे पाठवून देऊ. 
– सुधाकर अंभोरे ठाणेदार, शहर पोलीस स्टेशन

सौजन्य- जितेंद्र चोरडिया,चंद्रपूर