Ticker

6/recent/ticker-posts

कै.डॉ.जितेंद्र बिराजदार यांचे कार्य मोलाचे : श्री काशी जगद्गुरु

   मित्राच्या मृत्यूनंतर मित्रपरिवाराने घेतली मुलांची जबाबदारी

सोलापूर : दि.१२ (प्रतिनिधी) कै.डॉ.जितेंद्र बिराजदार यांनी वीरशैव साहित्यावर 'पीचडी' करून वीरशैव साहित्यामध्ये भर घातली. काशीपीठाच्या परीक्षा विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांचे कार्य मोलाचे आहे. त्यामुळे यापुढील काळात त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आपण स्वतः घेत असल्याचे प्रतिपादन श्री काशी जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य यांनी केले.


     
वीरशैव मराठी साहित्याचे अभ्यासक कै. डॉ. जितेंद्र बिराजदार यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या मित्र परिवारातर्फे मदतनिधी देण्याप्रसंगी ते आशीर्वचनपर बोलत होते. यावेळी मंचावर रेणुक शिवाचार्य, बसवराज शास्त्री-हिरेमठ, सचिव शांतय्या स्वामी, डॉ. अपर्णा कल्याणी, डॉ. अनिल सर्जे, राजेंद्र बलसुरे, राजशेखर बुरकुले व बिराजदार कुटुंबीय उपस्थित होते.
           

वीरशैव मराठी साहित्याचे अभ्यासक डॉ. जितेंद्र बिराजदार यांचे अचानक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंब उघड्यावर आले. आईला आपल्या मुलांच्या शिक्षणाची व भविष्याची चिंता सतावत होता. तेंव्हा जितेंद्र यांच्या पीएचडीच्या सहकारी डॉ. अपर्णा कल्याणी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. जितेंद्र यांच्या मित्रपरिवाराने व्हाट्सअपच्या माध्यमातून ग्रुप बनवून मित्रांना आवाहन केले. बघता बघता केवळ 8 दिवसात 1 लाख 80 हजार रुपयांचा निधी जमा झाला. तो निधी मुलीच्या शिक्षण आणि लग्नासाठी सुकन्या योजनेत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
          

तो निधी सुपूर्द करताना काशी जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य महास्वामीजी यांनी स्वतःचे 21 हजार रुपये त्यात घालून 2 लाख 1 हजार रुपयाचा निधी बिराजदार कुटुंबीयांकडे सुपूर्द केला. यावेळी बिराजदार कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.
                

प्रारंभी उपस्थितांचे स्वागत राजशेखर बुरकुले यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिल सर्जे यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र बलसुरे यांनी तर आभार प्रदर्शन गुरुषांत रामपुरे यांनी केले.

फोटो ओळी : कै.डॉ.जितेंद्र बिराजदार यांच्या कुटुंबीयांना मदतनिधी देताना डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य, रेणुक शिवाचार्य, बसवराज शास्त्री हिरेमठ, सचिव शांतय्या स्वामी, डॉ. अपर्णा कल्याणी, डॉ. अनिल सर्जे, राजेंद्र बलसुरे, राजशेखर बुरकुले