सोलापूर : दि.११ (प्रतिनिधी) अक्कलकोट तालुक्यातील दर्शनाळ, बोरेगाव, निलेगाव च्या कुशीत वसलेले गांव पितापूर... दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री मार्गे बोरेगाव ते पितापूर जाण्याचा मार्ग आहे. थोड्याच अंतरावर डोंबर जवळगे गांव राहते. या पितापूर गावाच्या मातीने मंगळवारी ह्रदयद्रावक आणि मानवी मनाला सुन्न करणारा कटू प्रसंग अनुभवलाय.
हेच पितापूर गाव त्या हृदयद्रावक वास्तवाने उजेडात आलं आहे. या जगात प्रत्येकाचे जगणं सुखाचं असावं अशा धारणेतून प्रत्येकाची धडपड सुरू असते. या धडपडीत जन्मणाऱ्या प्रत्येकाचं जगणं संपल्यावर मृत्यू हा क्रमप्राप्त असतो. जो जन्मतो, तो एक दिवस मृत्यूच्या कव्हेत जातो, हा निसर्ग नियम आहे त्यास कोणीही अपवाद ठरलेला नाही.
तरीही प्रत्येकाची जगण्याची धडपड ही रहाट-गाडग्याप्रमाणे सुरूच असते. हे जगणं सुखाचं व्हावं म्हणून सर्व आटापिटा सुरू असतो. ज्या दिवशी आपण मृत्यूच्या कव्हेत असू तो क्षण सुखाचा असावा अशा साधारण भावनेतून जगावं लागते. पितापूर गांवात मंगळवारी घडलेल्या घटनेने मृत्यूनंतर कलेवर यातना सोसत असावं असं दिसत.
त्या गावातील नूरअहमद शाहसाहब भंडारी या ५२ वर्षीय ग्रामस्थाचं मंगळवारी, ०९ ऑगस्ट रोजी निधन झालं. या आठवड्यात सर्वदूर पावसाची रिपरिप सुरू आहे. या संततधार पावसाने गांवाचे नदी नाले दुथडी भरून वाहात आहेत. त्यावेळी पावसाने जीवन चक्रच जणू थांबल्यागत झालं होतं.
नूरअहमद भंडारी यांचं निधन अशा संकटसमयी झालं असंच म्हणावं लागेल. खरं तर त्याची चाहूल लागावी म्हणून मृत्यू कधी घंटा वाजवून येत नाही, हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. या सत्याचा धागा धरून नूरअहमदची इहलोकाची यात्रा संपली, अन् तेथूनच एका करुणस्पर्शी तितक्याच हृदयद्रावक वास्तवाचा प्रारंभ झाला.
नूरअहमदच्या आप्तेष्टांनी अन् ग्रामस्थांनी एकत्र येऊन अंत्यविधीची तयारी केली. त्यावेळी गाव आणि कब्रस्तान यांच्यामध्ये थोडंफार अंतर असलं तरी तो जनाजा (शव) कब्रस्तानपर्यंत घेऊन जायचा कसा ही मोठी समस्या होती. गाव आणि कब्रस्तान यांच्या दरम्यान असलेली हरणा नदी दुधडी भरून वाहत होती. हे नदीचं भरलेलं पात्र ओलांडून ते शव पहिलं तीरावर नेऊन सुपूर्द-ए-खाक (दफनविधी) करणे गरजेचे होते.
ही समस्या लक्षात घेऊन आप्तेष्ट व ग्रामस्थांनी हवाबंद रिकामी पिंपं आणली त्यावर इतर साधनांच्या सहाय्याने तो जनाजा पाच-पंचवीस जणांचा जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यावरून तरंगत पैलतीरावर नेला. हा अनुभव थरारक आणि हृदयस्पर्शी प्रसंग प्रत्येक ग्रामस्थांनं 'याची देही, याची डोळा' अनुभवला.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात पितापूरकरांनी अनेक 'नूर' पैलतीरावर पोहोचले असतील ! आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या तयारीत आहोत. हा अमृत महोत्सव घरा-घरावर तिरंगा लावून साजरा करण्यासाठी प्रशासन सर्वत्र नागरिकांचं प्रबोधन करीत आहे. गेले ४० दिवस राज्य कारभाऱ्यांविना पोरकं होते, कदाचित ज्यावेळी 'नूर' चा अंतिम प्रवास पूराच्या पाण्यावरुन तरंगत सुरु होता.
पितापूरप्रमाणे जी गावं नदीकाठावर आहेत. त्या त्या गावातील ग्रामस्थाना मानवी मनाला सून्न करणाऱ्या अशा अनेक प्रसंगाला सामोरे जावे लागले असेल. जुलै महिन्यात पितापूरपासून थोड्याच अंतरावर असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील एक रहिवासी पूराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यास जीव गमवावा लागला होता. तिथंही पूल नसल्याने ती दुर्घटना घडली होती.
मानवी मनाला हेलावून टाकणारे अनेक प्रसंग घडत असतील, त्या सर्व घटना प्रकाशझोतात येतच असतील असे नाही. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही अशा ठिकाणांपर्यंत विकासाचं कवडसे पोहोचलेले नाही, हे विदारक सत्य पितापूर वा मुस्तीच्या दुर्घटनांनी दाखवून दिलं आहे. आशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी त्यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे गावागावांना जोडणारे मजबूत रस्ते अन् नदी नाल्यावर छोटे-मोठे पूल बांधण्याची गरज... हे मात्र नक्की !
