शहरातील नागरिकांना रानभाज्यांचे महत्व पटण्यासाठी रानभाजी महोत्सव आवश्यक - जिल्हाधिकारी शंभरकर
सोलापूर : दि.११ (प्रतिनिधी) शहरातील लोकांना रानभाज्यांचे महत्व समजण्यासाठी व रानभाज्यांची माहिती होण्यासाठी रानभाजी महोत्सव गरजेचा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.
प्रकल्प संचालक आत्मा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे आयोजित रानभाजी महोत्सव व शेतकरी दिन या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी श्री.शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक बाळासाहेब शिंदे, जिल्हा परिषद कृषी अधिकारी विवेक कुंभार, प्रकल्प उपसंचालक मदन मुकणे, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे,उत्तर तालुका कृषी अधिकारी जयंत कवडे, दक्षिणचे रामचंद्र माळी, तंत्र अधिकारी श्री.मंगरुळे, जिल्हा मृदा सर्वेक्षण चाचणी अधिकारी नामदेव गायकवाड आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. शंभरकर म्हणाले की, रानभाज्या आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी खूपच उपयुक्त आहेत. परंतु शहरातील लोकांना याची माहिती नसते.
शेतकऱ्यांना या रानभाज्यांची पूर्ण माहिती असते.या भाज्यांच्या सेवनाने आपण निरोगी राहू शकतो. आपली प्रतिकार शक्ती वाढवू शकतो. या भाज्यांचे सेवन केल्याने इतर बऱ्याचशा आजारांपासून दूर राहू शकतो. या महोत्सवाचे आयोजन शहरातील लोकांना रानभाज्यांची माहिती होण्यासाठी व शेतकऱ्यांनी रानभाज्यांची विक्री करण्याकरीता खूपच महत्वाचे आहे. महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून कोरोनाकालावधीच या महोत्सवाची सुरूवात झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा व स्वराज्य महोत्सव हे उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेवून 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा झेंडा फडकवावा, असे आवाहनही श्री.शंभरकर यांनी केले. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उपस्थित शेतकरी व स्टॉलधारक यांना राष्ट्रध्वजाचे वाटप प्राथमिक स्वरूपात करण्यात आले.
दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकरी, महिला बचत गटातील महिलांनी आपल्या शेतामध्ये पिकवलेल्या रानभाज्या विक्रीस आणल्या होत्या. याचबरोबर रानभाज्यांची ओळख व त्यांचे आहारातील महत्त्व समजण्यासाठी रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये तांदुळसा, चिघळ, माठ, कुंजीर, हादगा, अळू, पाथरी, उंबर, फळे, शेवग्याची पाने, सराटा, कुरडू, आघाडा, केना, खापरखुटी, गुळवेल, कपाळफोडी, भुई आवळा, पिंपळाची पाने, टाकळा / कास्वद इत्यादी जवळपास २७ प्रकारच्या रानभाज्यांचे 15 स्टॉल प्रदर्शनामध्ये मांडण्यात आले होते. या कार्यक्रमास शहर व परिसरातील नागरीकांनी रानभाज्यांची खरेदी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या महोत्सवामध्ये 50 शेतकरी, दोन शेतकरी उत्पादक कंपन्या यांचा सहभाग होता. या महोत्सवामध्ये शेतकऱ्यांना 700 ते 800 रुपये भाज्या विक्रीतून मिळाल्याची माहिती कृषी खात्याकडून देण्यात आली.
