Ticker

6/recent/ticker-posts

...पोलीस वाहनांसमोर बसून ठिय्या आंदोलन

सोलापूर : दि.१८ (प्रतिनिधी) महानगरपालिका आयुक्त पि. शिवशंकर हटावचा नारा देत सोलापूर पालिकेतील शेकडो कर्मचारी आज रस्त्यावर उतरले. सोलापूर पालिका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा आक्रोश मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांनी देखील पाठिंबा दिला होता. मात्र,या मोर्चाला गालबोट लागल्याचा प्रकार समोर आला आहे.

जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आल्यानंतर - सदर बाजार पोलिसांनी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या कामगार नेते अशोक जानराव यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पालिका कर्मचाऱ्यांनी विरोध केला. एकनाथ शिंदे समर्थकांनी देखील पोलिसांचा विरोध केला. यावरून पोलिसांसोबत शाब्दिक खडाजंगी झाली. त्यानंतर शिंदे गटाचे कट्टर समर्थक मनीष काळजे यांनी पोलीस वाहनांसमोर बसून ठिय्या आंदोलन केले.

आक्रोश मोर्चाला परवानगी नसल्याने अटक -सोलापूर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आयुक्त हटाव असा नारा देत सोलापूर महानगरपालिका तर जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर पायी चालत आक्रोश मोर्चा काढला. या आक्रोश मोर्चाला परवानगी नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. कामगार नेते अशोक जानराव यांच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. त्यानंतर बाहेर येताच पोलिसांनी जानराव यांना अटक केली. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना विरोध केला.

एकनाथ शिंदे समर्थकांची आणि पोलिसांची बाचाबाची - सोलापूर शहरातील मनीष काळजे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत. ते आपल्या कार्यकर्त्यांसह पालिका कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. जानकरांना अटक करताना शिंदे समर्थाकांची पोलिसांसोबत झटापट झाली. पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांनी अडवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील पोलीस व्हॅनमध्ये बसवले. मनीष काळजे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत पोलीस व्हॅनसमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. पोलिसांनी सर्वांना बाजूला करून आंदोलकांना घेऊन गेले. आंदोलकांची व मुख्यमंत्री समर्थकांची पोलिसांसोबत बाचाबाची झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.