Ticker

6/recent/ticker-posts

चीनचे वाणिज्य दूत कॉंग झिंयान हुआ यांनी दिली डॉक्टर कोटणीस स्मारकास भेट

उज्वल भविष्यासाठी भारत - चीन मैत्रीचे संबंध अधिक दृढ राहतील

सोलापूर : दि.१८ (प्रतिनिधी) डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांनी चीनमध्ये अडचणीच्या काळात येऊन आरोग्य सेवा दिली. त्यांचे कार्य अतुलनीय आहे.  चीन ते कधीही विसरणार नाहीत. त्यांचा मैत्रीचा वारसा पुढे चालू ठेवणार आहोत असे सांगतानाच उज्वल भविष्यासाठी भारत - चीन मैत्रीचे संबंध अधिक दृढ राहतील अशी ग्वाही चीनचे वाणिज्य दूत (कौन्सिल जनरल) कॉंग झिंयान हुआ यांनी सोलापूर भेटी प्रसंगी दिली.
     
चीनचे वाणिज्य दूत (कौन्सिल जनरल) कॉंग झिंयान हुआ यांच्यासह शिष्टमंडळाने -  बुधवारी दुपारी सोलापुरातील डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस स्मारकास भेट दिली. प्रारंभी महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शिष्टमंडळात चीनचे कौन्सलर ली मिंगमिंग , काऊंसुल  वाँग अँग, व्हॉइस काऊंसुल झिओंन्ग फैंगझिंग , डायरेक्टर डचेंग झु आदीं अधिकारी उपस्थित होते. तसेच महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप, उपायुक्त विद्या पोळ आदी उपस्थित होते.तसेच युवा नेते मनीष काळजे , डॉक्टर राजेंद्र जाधव उपस्थित होते.
     
चीनचे वाणिज्य दूत कॉंग झिंयान हुआ यांनी येथील डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून मनोभावे अभिवादन केले. त्यानंतर महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी या स्मारकासंदर्भात अधिक माहिती दिली. चीनचे वाणिज्य दूत कॉंग झिंयान हुआ यांनी स्मारकातील म्युझियममधील सर्व छायाचित्रे पाहिली. त्यासंदर्भात माहिती घेतली व समाधान व्यक्त केले. 

डॉक्टर कोटणीस यांच्या कार्याचे कायम स्मरण राहील : कॉंग झिंयान हुआ - दुसऱ्या महायुद्धावेळी चीन आणि जपान एकमेकांविरुद्ध लढले होते. त्यावेळी भारतातून गेलेल्या डॉक्टरांच्या पथकात डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांचा सहभाग होता. त्यांनी आपले प्राण धोक्यात घालून अनेक चिनी सैनिकांचे प्राण वाचवले होते. चांगली वैद्यकीय सेवा दिली. त्यांचे कार्य चीन लोकास सदैव स्मरणात राहणार आहे. यामुळेच आज आम्ही डॉक्टर कोटणीस यांच्या मूळ गावी सोलापूर येथील त्यांच्या स्मारकास भेट दिली. म्युझियम पाहिले. डॉक्टर कोटणीस यांचे कार्य अतुलनीय आहे. डॉक्टर कोटणीस यांच्या मिशनचा वारसा चालू ठेवणार आहोत उज्वल भविष्यासाठी भारत -चीन मैत्रीचे संबंध अधिक दृढ राहतील असेही यावेळी चीनचे वाणिज्य दूत कॉंग झिंयान हुआ यांनी स्पष्ट केले.

30 ऑगस्ट रोजी चीनचे ॲम्बेसिडर देणार भेट !
याप्रसंगी चीनचे वाणिज्य दूत कॉंग झिंयान हुआ यांनी डॉक्टर कोटणीस स्मारकातील चीनचे माओ यांनी त्यावेळी पाठविलेले शोक संदेश पत्र वाचले. दरम्यान ते पत्र जतन व्हावे यासाठी चीनने पाच वर्षांपूर्वी काचेची जतन पेटी सोलापूरला पाठविली होती मात्र पुणे येथील एका एजन्सीकडे या जतन पेटीची चावी राहिली आहे. त्यामुळे ते पत्र या जतन पेटीत ठेवता येत नसल्याची बाब महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली. येत्या 30 ऑगस्ट रोजी चीनचे ॲम्बेसिडर येथे येणार आहेत. त्यावेळी ॲम्बेसिडर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात येईल अशी ग्वाही चीनचे वाणिज्य दूत कॉंग झिंयान हुआ यांनी यावेळी दिली.
   
डॉक्टर कोटणीस स्मारक सर्वांसाठी प्रेरक : आयुक्त पि. शिवशंकर - चीनचे वाणिज्य दूत आणि शिष्टमंडळाने सोलापुरातील डॉक्टर कोटणीस स्मारकास भेट दिली. चीनचे माओ यांनी त्यावेळी पाठविलेले शोक संदेश पत्र त्यांना दाखविले. ते ठेवण्यासाठी जतन पेटी चीनने दिली होती.त्याची अडचण सांगितली. त्याचेही येत्या 30 ऑगस्ट रोजी ॲम्बेसिडर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल असे वाणिज्य दूत यांनी सांगितले आहे.  डॉक्टर कोटणीस यांचे कार्य आणि चीन व भारताचा मैत्रीचा इतिहास नव्या पिढीसमोर ठेवण्यासाठी डॉक्टर कोटणीस स्मारक सर्वांसाठी प्रेरक राहणार असून या स्मारकाच्या देखभालीसाठी महापालिका सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी यावेळी सांगितले.
     
यावेळी निवृत्त पोलीस उपअधीक्षक मोहिते यांनी डॉक्टर कोटणीस स्मारक येथे घेण्यात येत असलेल्या चायनीज भाषा वर्गाची माहिती दिली.
     
यावेळी डॉक्टर कोटणीस स्मारकाचे व्यवस्थापक प्रदीप जोशी, उप अभियंता एस.एम.अवताडे, उद्यान अधीक्षक रोहित माने यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर चीनचे वाणिज्य दूत कॉंग झिंयान हुआ यांनी यावेळी सोलापूर महानगरपालिकेलाही भेट दिली.