Ticker

6/recent/ticker-posts

MPSC पेपरफुटी, MHT-CET घोटाळा आणि TET रद्द करण्याची मागणी; संभाजी ब्रिगेडचे सोलापुरात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


सोलापूर : MPSC पेपरफुटी, MHT-CET परीक्षा घोटाळा, निवड प्रक्रियेतील पर्सेंटाईल पद्धत रद्द करणे,शिक्षक पात्रता परीक्षा (TET) कायमस्वरूपी बंद करणे तसेच सर्व शासकीय भरती व प्रवेश परीक्षा ऑनलाइनऐवजी ऑफलाइन पद्धतीने घेण्याची मागणी करत संभाजी ब्रिगेड शहर जिल्ह्याच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी इंजि.अभिजीत पाटील यांना निवेदन देण्यात आले.

संभाजी ब्रिगेडने दिलेल्या निवेदनात राज्यातील परीक्षा प्रक्रियेत सातत्याने होत असलेल्या गैरव्यवहारांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. MPSC, MHT-CET, NEET तसेच इतर विविध परीक्षांमध्ये पेपरफुटी आणि घोटाळ्यांच्या घटना घडल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच MHT-CET मधील पर्सेंटाईल पद्धत ग्रामीण आणि गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी असल्याचा दावा करत ही पद्धत रद्द करून पारदर्शक व न्याय्य प्रणाली लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. सर्व भरती व प्रवेश परीक्षा ऑफलाइन घेऊन परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

संभाजी ब्रिगेडच्या म्हणण्यानुसार,सततच्या पेपरफुटी आणि परीक्षा घोटाळ्यांमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी असून दोषींवर कठोर कारवाई करून पीडित विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

सरकारने या प्रश्नांकडे तातडीने गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा संभाजी ब्रिगेड राज्यभर अधिक तीव्र आंदोलन छेडेल,असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी सोमनाथ राऊत (संभाजी ब्रिगेड नेते व धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख), प्रकाश ननवरे (शहराध्यक्ष), सचिन चव्हाण (उपाध्यक्ष), नितीन मोहिते (प्रसिद्धीप्रमुख), अजयसिंह सौंमदळे (जिल्हा उपाध्यक्ष), अंबादास सपकाळे, रमेश अण्णा जाधव, कल्याण गव्हाणे, प्रकाश व्यवहारे, प्रकाश डोंगरे, अजसिंग भोसले, अजय जाधव, विजय जाधव यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.