Ticker

6/recent/ticker-posts

महिला हॉस्पिटल–विमानतळ–साखर कारखाना रस्त्याचे काम थांबवू नका; नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका - विजयकुमार हत्तुरे


सोलापूर : महिला हॉस्पिटल–विमानतळ–साखर कारखाना या महत्त्वाच्या रस्त्याच्या विकासकामाबाबत महापौर कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर ज्येष्ठ काँग्रेस नेते विजयकुमार हत्तुरे यांनी प्रशासनाच्या नियोजनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्याचे तब्बल ६० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाल्यानंतर अचानक तांत्रिक त्रुटींचा मुद्दा उपस्थित करणे हे सोलापूर महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित विभागांच्या नियोजनातील मोठे अपयश असल्याचा आरोप त्यांनी केला.

हत्तुरे म्हणाले की, महिला हॉस्पिटल–विमानतळ–साखर कारखाना हा रस्ता सोलापूर शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि व्हीआयपी मार्ग म्हणून ओळखला जातो. दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, व्यापारी आणि वाहनधारक या मार्गाचा वापर करतात. रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी ड्रेनेज, पाणीपुरवठा, स्टॉर्म वॉटर ड्रेन, भूमिगत सुविधा आणि इतर आवश्यक बाबींचे नियोजन होणे अपेक्षित होते. मात्र, काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्यानंतर त्रुटींची आठवण होणे म्हणजे प्रशासनातील समन्वयाच्या अभावाचे द्योतक असल्याचे त्यांनी सांगितले.


"काम सुरू होण्यापूर्वी संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी पाहणी केली नव्हती का? आज ६० टक्के काम पूर्ण झाल्यानंतरच त्यांना त्रुटी दिसू लागल्या आहेत का? आतापर्यंत हे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी झोपले होते का?" असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.

कोणत्याही परिस्थितीत रस्त्याचे काम थांबवू नये, अशी ठाम भूमिका मांडताना हत्तुरे म्हणाले की, काम बंद झाल्यास परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागेल. वाहतूक कोंडी, धुळीचे प्रदूषण, अपघातांचा धोका आणि दैनंदिन हालअपेष्टा वाढतील. त्यामुळे आवश्यक तांत्रिक सुधारणा करत काम तातडीने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावे.

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि काही लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्याचा इशाराही दिला. विकासकामांमध्ये सातत्याने दिसणारा समन्वयाचा अभाव आणि नियोजनशून्य कारभार याबाबत राज्य शासनाने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.


"नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. रस्त्याचे काम तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करा. अन्यथा या भागातील नागरिकांना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन आणि रास्ता रोको करण्याशिवाय पर्याय उरणार नाही," असा इशाराही त्यांनी दिला.

महिला हॉस्पिटल–विमानतळ–साखर कारखाना हा रस्ता सोलापूरच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावर श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, एफसीआय गोदाम, किर्लोस्कर इंडस्ट्रीज (शिवशाही), एनटीपीसी प्रकल्प, अनेक सिमेंट उद्योग तसेच अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील सुमारे ४० गावांचा शहराशी संपर्क या मार्गावर अवलंबून आहे.

स्थानिक नागरिकांनीही सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांच्याकडे रस्त्याचे काम कोणत्याही कारणास्तव बंद न करता ते वेगाने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत राजकारण आणि दिरंगाई बाजूला ठेवून प्रशासनाने विकासकामे वेळेत पूर्ण करावीत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.