सोलापूर : सुमारे ३ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार व ठेवीदारांची फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या सुजाता रमेश चिप्पा यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच, कोल्हापूरने सशर्त जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती मेहरोज के. पठाण यांनी जामीन अर्ज क्रमांक ४७७/२०२६ मध्ये २२ जुलै २०२६ रोजी हा आदेश दिला.
जेल रोड पोलीस ठाणे, सोलापूर येथे गुन्हा क्रमांक ३३४/२०२४ अंतर्गत रमेश अंबादास चिप्पा आणि सुजाता रमेश चिप्पा यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४०६, ४२०, ३४ तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंध संरक्षण अधिनियम (MPID Act) कलम ३ अन्वये ५ जुलै २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादीनुसार, श्री ओम साई फायनान्सच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना अधिक परताव्याचे आमिष दाखवून ठेवी स्वीकारण्यात आल्या. त्यानंतर १३१ गुंतवणूकदारांची सुमारे २.६९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात सुजाता रमेश चिप्पा यांना १० ऑक्टोबर २०२५ रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालय,सर्किट बेंच,कोल्हापूर येथे जामिनासाठी अर्ज दाखल केला.
आरोपीतर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की,सुजाता चिप्पा या केवळ मुख्य आरोपी रमेश चिप्पा यांच्या पत्नी असल्यामुळे त्यांना गुन्ह्यात गोविण्यात आले आहे.
एफआयआर तसेच गुंतवणूकदारांच्या जबाबांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप मुख्य आरोपीविरुद्ध असून, सुजाता चिप्पा यांनी कोणत्याही गुंतवणूकदाराशी संपर्क साधलेला नाही किंवा कोणतेही सेमिनार आयोजित केलेले नाही. तसेच त्यांच्या बँक खात्यातील व्यवहारही मुख्य आरोपीकडूनच करण्यात येत असल्याचा दावा बचाव पक्षाने केला.
सरकार पक्षाने जामिनास विरोध केला. मात्र दोन्ही बाजूंचे युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने आरोपी सुजाता रमेश चिप्पा यांना सशर्त जामीन मंजूर केला.
या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी, ॲड. सौरभ तांदळे, ॲड. रोहित थोरात, पैगंबर सय्यद, ॲड. वैभव बोंगे, ॲड. ओंकार फडतरे, ॲड. सलामत पटेल, ॲड. शिवरत्न वाघ, ॲड. मोहीम पठाण, ॲड. मनिष बाबरे, ॲड. अजय वाघमारे, ॲड. त्वरिता वाघ, ॲड. संकेत पवार, ॲड. प्रदीप गायकवाड आणि ॲड. सागर स्वामी यांनी काम पाहिले. सरकार पक्षातर्फे ॲड. देशमुख यांनी बाजू मांडली.
