सेवा फाउंडेशनच्या अध्यक्ष तथा माजी सहाय्यक आयुक्त प्रकाश राठोड यांच्या नेतृत्वाखाली बैठक; महाप्रसादाचे आयोजन
सोलापूर : संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरात दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य मिरवणूक व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त बंजारा समाजाची विस्तृत बैठक सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी सहायक आयुक्त प्रकाशभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. बैठकीत उत्सव समितीची स्थापना करून विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून यंदाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. उत्सवाच्या नियोजनासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव,सल्लागार तसेच विविध समित्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. शहरातील विविध भागांतून समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित असून मिरवणुकीला भव्य स्वरूप देण्याची तयारी सुरू आहे.
मिरवणुकीचा मार्ग व वेळापत्रक - दि. १५फेब्रुवारी २०२६ , रविवार रोजी दुपारी २:०० वाजता संत सेवालाल चौक, इजगिरी माठ,विजापूर रोड येथून मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. दुपारी २:३० वाजता स्व.वसंतराव नाईक साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर मिरवणूक दुपारी ३:०० वाजता विजापूर नाका येथे पोहोचेल. दुपारी ३:३० वाजता विजापूर नाका येथून संत सेवालाल चौक येथे आगमन होईल. सायंकाळी ४:३० वाजता प्रतापनगर तांडा येथे मिरवणूक दाखल होणार असून सायं. ५:३० वाजता गोरपिठ प्रताप नगर तांडा येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात येईल.
धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद - सायंकाळी ६:०० वाजता गोरपिठ येथे संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेसमोर भोग अर्पण करून सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. संत सेवालाल महाराजांनी समाजात एकता,सेवा,संस्कार आणि आध्यात्मिक मूल्यांचा संदेश दिला. त्यांच्या शिकवणीचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि समाजात ऐक्य दृढ करण्यासाठी हा जन्मोत्सव साजरा केला जात असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या बैठकीत अध्यक्ष-सूनिल राठोड, उपाध्यक्ष- सूरज पवार,शिवानंद राठोड,राजू चव्हाण,कार्यअध्यक्ष-संजय जाधव,सचिव-बंडू पवार सहसचिव-दत्ता राठोड,मिथून राठोड ,संपर्क प्रमुख-उमेश चव्हाण,गजानन चव्हाण,प्रसिद्ध प्रमुख-आकाश चव्हाण,सल्लागार-भारत राठोड,राजू जाधव(महाराज) गोविंद पूढारी,मिरवणूक प्रमुख-प्रवीण जाधव,अमित राठोड तमाम बंजारा समाज बांधवांनी तसेच सर्व नागरिकांनी दि. १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या भव्य मिरवणुकीत सहभागी होऊन “संत सेवालाल महाराज की जय” असा जयघोष करावा,असे आवाहन उत्सव आयोजित समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
