पूरग्रस्त एकल महिलांना रोजगारासाठी शेळ्यांचे वाटप ; पाथरूड येथे 'जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय'चा उपक्रम.
भूम तालुक्यातील पाथरूड येथे 'जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय' (NAPM) ने 'शाश्वत विकास न्यास' च्या माध्यमातून पूरग्रस्त २१ एकल महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी शेळ्यांचे (पाट) वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत देऊळगाव,कात्राबाद,खासापूरी,ढगपिंपरी,रुई, परांडा आणि वालवड येथील एकूण २१ गरजू महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यात आले.
पारदर्शक निवड आणि नियोजन- या कार्यक्रमासाठी महिलांची निवड आणि स्थानिक आयोजनात 'रुद्रा संस्था' (अंबी), 'आधार सामाजिक संस्था' आणि 'एकल महिला संघटन' यांचे मोलाचे सहकार्य लाभले. एन.ए.पी.एम. चे राष्ट्रीय समन्वयक युवराज श्रीहरी गटकळ यांनी गेली तीन महिने सातत्याने पाठपुरावा करून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे यशस्वी केली.
प्रमुख उपस्थिती, मार्गदर्शन आणि संवाद - कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी महिलांशी संवाद साधला, ज्यामध्ये महिलांनी आपल्या समस्या आणि गरजा मोकळेपणाने मांडल्या. याप्रसंगी : ईला कांबळी (विश्वस्त, शाश्वत विकास न्यास) यांनी मुलांचे शिक्षण,स्कॉलरशिप आणि रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले.
सुरेखा जगदाळे (अध्यक्षा, लोकप्रतिष्ठाण व रुद्रा संस्था) यांनी महिला बचत गट, सामूहिक व्यवसाय आणि बाजारपेठ (मार्केट) या विषयावर बोलून महिलांचे मनोबल वाढवले. युवराज गटकळ (राष्ट्रीय समन्वयक, NAPM): यांनी महिलांना संघटित होऊन आर्थिक व सामाजिक मुद्द्यांवर काम करण्याचा विश्वास दिला. तर "तुम्ही तयार असाल तर मेधा पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना कायम तुमच्या पाठीशी उभी राहील," असे आश्वासन इब्राहीम खान यांनी दिले.
यावेळी एन.ए.पी.एम. चे राज्य समन्वयक इब्राहिम खान, इला कांबळी, सुरेखा जगदाळे, बाबा पवार, युवराज गटकळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात बालसंगोपन,एकल महिला पेन्शन आणि शासनाच्या विविध योजनांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. " एकल महिलांनी ही मदत आनंदाने स्वीकारली. आज शेळी च्या स्वरूपातील मदत ही एकल महिलांचा आत्मविश्वास वाढवणारी आहे. - प्रतिभा गपाट,एकल महिला संघटन.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबा पवार, नितीन बोराडे, प्रशांत तिकटे आणि बापू टेकाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. या मदतीमुळे पूरग्रस्त एकल महिलांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य येण्यास मोठी मदत होणार आहे.
