Ticker

6/recent/ticker-posts

महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न


सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक १६ ऑक्टोबर गुरुवार रोजी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत शहरातील अतिवृष्टीमुळे नाल्यांच्या प्रवाहास अडथळा निर्माण होऊन निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच भविष्यात अशा परिस्थितीत नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी तात्काळ आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आले.



बैठकीदरम्यान संबंधित विभागांनी नालेसफाई,पावसाळी जलनिस्सारण,अतिक्रमण निर्मूलन,अपत्कालीन यंत्रणा सज्जता,तसेच अग्निशमन दलाच्या तत्परतेबाबत सादरीकरण केले. आयुक्त डॉ.ओम्बासे यांनी सर्व विभागांना समन्वय साधून तातडीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

त्यांनी स्पष्ट केले की,अतिवृष्टीच्या काळात नाल्यांचा प्रवाह सुरळीत राहण्यासाठी अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण तत्काळ हटविण्यात यावेत,तसेच नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्ष सतत कार्यरत ठेवावा. त्यांनी प्रत्येक विभागाने आपल्या कार्यक्षेत्रातील समस्यांचा कृती आराखडा तयार करून तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले.



या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,उपायुक्त आशिष लोकरे,सह. नगर रचना संचालक मनिष भिष्णुरकर,नगर अभियंता सारिका आकूलवार, अतिक्रमण नियंत्रण अधिकारी तपन डंके,गोकुळ चितारी, चंद्रकांत गुंडे,अमीर शेख,अग्निशमन विभागाचे औचित्य दुद्यळा तसेच सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते.

बैठकीचा शेवट आयुक्त डॉ.ओम्बासे यांनी शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे सांगून केला आणि सर्व विभागांनी संयोजित पद्धतीने आपत्ती व्यवस्थापनासाठी तत्पर राहावे,असे निर्देश देण्यात आले.