Ticker

6/recent/ticker-posts

व्हीजेएनटी समितीकडून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अभिनंदनाचा ठराव...

विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी जिल्हा प्रशासनाचा पथदर्शी उपक्रम.

सोलापूर : महाराष्ट्र विधानमंडळाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीच्या तीन दिवसीय दौऱ्यात जिल्हा प्रशासनाच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली. समिती प्रमुख आमदार सुहास कांदे व सर्व सदस्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्ह्यात व्ही जे एन टी समाजासाठी आयोजित करण्यात आलेल्या २५ विशेष शिबिरांमधून वंचित नागरिकांना विविध मूलभूत सेवा उपलब्ध करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा यशस्वी प्रयत्न केल्या बद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुकाचा ठराव मांडला व तो सर्वांनी एकमताने मंजूर केला.
    
या शिबिरांद्वारे विमुक्त जाती व भटक्या जमाती मधील नागरिकांना १६०९ मतदान ओळखपत्रे,१४२१ जात प्रमाणपत्रे,५१७ आधार कार्ड,१९ दिव्यांग प्रमाणपत्रे, तसेच ९१४ आयुष्यमान भारत कार्ड वितरित करण्यात आले. विशेष म्हणजे,६२ लाभार्थ्यांना घरकुलासाठी मोफत जमीन वाटप करण्यात आली,ज्यामुळे या समाजघटकांना स्थैर्य व सन्मान प्राप्त झाला.

समितीने या उपक्रमाचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले असून,हा उपक्रम संपूर्ण राज्यात पथदर्शक प्रकल्प म्हणून राबविण्याची शिफारस करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी व्हीजीएनटी समाजासाठी घेतलेल्या पुढाकाराचे समितीने विशेष कौतुक केले असून,राज्यस्तरीय धोरणनिर्मितीत या अनुभवाचा उपयोग केला जाणार आहे.