Ticker

6/recent/ticker-posts

विवाहितेवर लैंगिक अत्याचार व धर्मांतर प्रकरणी अटकेतील आरोपीस सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयातून सशर्त जामीन मंजूर!


सोलापूर : सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने विवाहित महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार व धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी रमजान रजाक शेख (वय २५ वर्षे,रा. कुसूर,जि.सोलापूर) यास सशर्त जामीन मंजूर केला आहे.

मंद्रुप पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध गु.र. क्र. ०१३९/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४(२)(एम), १२७(४), ११५(२), ३५१(२) आणि ३५१(३) प्रमाणे दि.-२४ एप्रिल २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


सदरील प्रकरणात फिर्यादी पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार,अटकेतील आरोपी रमजान शेख याने इन्स्टाग्रामद्वारे संपर्क साधून धमकावून व पिडीतेची फसवणूक करून तिला व तिच्या ३ वर्षीय अल्पवयीन मुलीस पुणे येथील भोसरी येथे एका घरात ठेवून जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. तसेच आरोपीने १७ मार्च २०२५ ते २२ एप्रिल २०२५ या काळात आरोपीने सदरील पिडीतेवर ‘मुस्लीम धर्म स्वीकार’ असा दबाव आणत तिच्या जीवितास व मुलीच्या जीवितास धोका निर्माण केला होता. आरोपीने पीडीतेला भोसरी येथील घरात दाबून ठेवल्याने तो कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर त्या खोलीतून बाहेर येऊन शेजारच्या महिलेकडून फोन घेऊन तिच्या पतीस संपर्क साधले होते. तसेच पिडितेच्या वडिलांनी मंद्रूप पोलीस स्टेशन येथे मिसिंग तक्रार देखील दाखल केली होती.


या प्रकरणात आरोपी रमजान रजाक शेख याला २४ एप्रिल २०२५ रोजी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आरोपीने मे. जिल्हा व सत्र न्यायालय,सोलापूर येथे आपला जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. 
सुनावणीदरम्यान आरोपीतर्फे वकिलांनी असा युक्तिवाद केला की,संपूर्ण तपास पूर्ण झाला असून दोषारोप पत्र दाखल झाले आहे. फिर्यादीने खोट्या तक्रारी केल्या असून हा प्रकरण परस्पर संमतीतील संबंधाचा आहे. तदनंतर दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.एन.सुरवसे यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे.

या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड.दत्तात्रेय कापुरे,ॲड.वैभव बोंगे,ॲड.ओंकार फडतरे,ॲड.मोहीम पठाण,ॲड.शिवरत्न वाघ आणि ॲड.मनिष बाबरे यांनी काम पाहिले.