Ticker

6/recent/ticker-posts

फुल तिकीट घ्या पण आमची सारोळा गाडी द्या


मी अपंग म्हणून जन्माला आलो हा माझा गुन्हा का ? अपंग आहे म्हणून मी घराबाहेर पडायचं नाही का ? मला गाडी चालवता येत नाही पण माझ्यामुळे मर्यादित खनिजसाठा असलेल्या पेट्रोलची नासाडी होत नाही हा माझा गुन्हा का ?

मला वैरागमध्ये उशीर झाल्यावर गावाकडे जायला एस टी नाही म्हणून मी कितीवेळा स्टँडवर झोपायचं ? माझा आजा म्हणायचा की सूर्य उगवल न उगवल पण सारोळा गाडी यायला चुकायची नाही ! आई म्हणायची लवकर सारोळानं जा आणि उशीर झाला तरी सारोळानं ये ! 




सकाळ संध्याकाळच्या सारोळा गाडीमुळे सारोळा काटी खुंटेवाडी धामणगाव राळेरास या गावातल्या लोकांमधी ओळखी पाळखी होऊन अनेक सोयरीक जमली ! या गावातील दिव्यांग बांधव,म्हतारे-कोतारे,पै पाहुणे,शालेय विद्यार्थी सारोळा गाडीच्या भरवशावर आहेत. पण आता हक्काची सारोळा गाडी बेभरवशाची का झाली ? शहरात मेट्रो आली आणि खेड्यातील सारोळा बंद पडली ! प्रगती झाली का अधोगती झाली ? खेड्याकडे चला म्हणणार्‍या गांधी बाबाचा आत्मा काय म्हणत असेल ?





तुम्हाला जर एस टी फेरी परवडत नसेल तर फुकट निम्मं तिकीट असली थेरं कोणी सांगितली ? फुल तिकीट घ्या पण एस टी द्या ! हा दिव्यांग हात जोडतो पाया पडतो पण आमची सारोळा नियमीत चालू करा !  आमची लालपरी आमची लक्ष्मी आमच्यापासून हिरावून घेऊ नका. दिव्यांग बांधव पांडुरंग जाधव संघर्ष दिव्यांग संघटना जिल्हा प्रमुख सोलापूर!