बीड : दि.०२ (प्रतिनिधी) महाराज,माझ्या बापाच्या अंगावर अशी एक जागा नाही जिथे आरोपींनी मारले नाही. त्यांच्या अस्थीवेळी केवळ तीन हाडे मिळाली. आमची मानसिकता कोण समजून घेणार...? असा भावनिक पण तितकाच रोखठोक सवाल दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुखने भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींना विचारला.
संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांची मानसिकता आपण समजून घ्यायला पाहिजे,असे वादग्रस्त वक्तव्य महंत नामदेव शास्त्री यांनी केले होते. तसेच या घटनेत वंजारी समाजाला लक्ष्य करण्यात येत असल्याचेही नामदेव शास्त्री म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर देशमुख कुटुंबियांनी भगवानगडावर जाऊन आरोपींची गुन्हेगारी कृत्ये आणि त्यांच्यावर दाखल असलेली कलमे आदींसंबंधी नामदेव शास्त्रींसमोर पुरावे सादर केले.
आपण माझ्यापेक्षा खूप मोठे आहात,तमाम भक्तांचे गुरू आहात. पण आपण केलेले विधान हे आम्हाला पटले नाही, अशा शब्दात वैभवी देशमुख हिने भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींना ऐकवले. तसेच माझ्या वडिलांचे फोटो आजही आम्हाला पाहू वाटत नाही. त्यांची हत्या कशी झाली, आरोपींशी ते कृत्य किती निर्धास्तपणे केले,अशी संपूर्ण घटना समजावून घ्यायला पाहिजे होती आणि नंतर वक्तव्य करायला पाहिजे होते,असे सांगत अप्रत्यक्षपणे शास्त्रींवर नाराजी व्यक्त केली.
त्यावर नामदेव शास्त्री यांनी आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे म्हटले. मी आरोपींची बाजू घेतली नाही, घेणार नाही. फक्त याला जातीय रंग लागायला नको,अशी अपेक्षा व्यक्त करीत देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी भगवानगड खंबीरपणे उभा राहील,असे आश्वस्त केले. सुरुवातीला आरोपींची मानसिकता समजून घ्या म्हणत कड घेणाऱ्या शास्त्रींनी प्रचंड टीकेनंतर एक पाऊल मागे घेतले.
