मुंबई : दि.२५ (एमडी२४न्यूज) महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. महावितरणने पहिल्यांदाच वीज दर कपातीचा प्रस्ताव सादर केला असून, तो मंजूर झाल्यास पुढील पाच वर्षांत घरगुती विजेचे दर तब्बल २३ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. कोळशावर आधारित महागडी वीज खरेदी करण्याऐवजी सौरऊर्जेवर भर देण्याच्या धोरणाचा हा परिणाम आहे.
महावितरणने पुढील पाच वर्षांचे वीज दर ठरविण्यासाठीचा प्रस्ताव नुकताच वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. या प्रस्तावात,येत्या पाच वर्षात टप्प्याटप्प्याने वीज दर कमी करण्याचे नियोजन असून,सौरऊर्जेचा वापर वाढवून वीज उत्पादन खर्चात बचत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रस्तावामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
सौरऊर्जेवर भर - महावितरणचा जवळपास ८५ टक्के खर्च हा वीज खरेदीवर होतो. कोळशावर आधारित वीज महाग असल्याने हा खर्च कमी करण्यासाठी सौरऊर्जेसारख्या अक्षय ऊर्जा स्रोतांकडे वळण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. भविष्यात १५ ते १६ हजार मेगावॅट वीज सौरऊर्जेच्या माध्यमातून तयार करण्यावर भर दिला जाणार आहे.
सध्या महावितरणला दिवसा सरासरी दोन हजार मेगावॅट वीज सौरऊर्जेच्या माध्यमातून उपलब्ध होते. योग्य नियोजन आणि अंमलबजावणी केल्यास,भविष्यात यात मोठी वाढ होऊन वीज खरेदीवरील खर्चात लक्षणीय बचत होईल,असा विश्वास महावितरणने व्यक्त केला आहे.
दर कमी होणार - प्रस्तावानुसार,येत्या पाच वर्षात घरगुती विजेचे दर २३ टक्क्यांनी कमी होणार आहेत. सर्वसाधारणपणे वीज दर दरवर्षी ८ ते १० टक्क्यांनी वाढणे अपेक्षित असते,परंतु सौरऊर्जेमुळे खर्चात बचत होऊन दर कमी ठेवणे शक्य होणार आहे.
सध्या ९ रुपये ४५ पैसे प्रतियुनिट असणारा सर्वसाधारण दर पुढील पाच वर्षांत कमी होऊन ९ रुपये १४ पैसे इतका होईल. विशेषतः १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल,कारण त्यांचे दर ५ रुपये ८७ पैसे प्रतियुनिटपर्यंत कमी होतील असा अंदाज आहे.
सुनावणी आणि हरकती - या वीज दर प्रस्तावासंदर्भात २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता नवी मुंबईमधील सिडको भवनमध्ये,तसेच पुणे,नाशिक,छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर येथे देखील सुनावणी होणार आहे.
ग्राहकांना या सुनावणी दरम्यान आपले म्हणणे मांडता येईल. तसेच, १७ फेब्रुवारीपर्यंत वीज दराच्या प्रस्तावावर सूचना आणि हरकती लेखी स्वरूपात दाखल करता येतील
