बाकीचे भ्रष्ट डोम कावळे अँटी करप्शन ब्युरोच्या रडारवर
सोलापूर : दि.१८ (एमडी२४न्यूज) सोलापूर सिव्हिल सर्जन कार्यालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सोलापूर सिव्हिल सर्जन कार्यालयात बसून लाखो रुपयांचा मलिदा गोळा करत बसलेला महात्मा फुले जन आरोग्य विभागाचा जिल्हा समनव्यक डॉ माधव विष्णू जोशी(वय ४८) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर युनिटने एक लाख रुपये लाच घेताना ताब्यात घेतले आहे सदर बाजार पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. भ्रष्टाचाराचा अड्डा असलेल्या सोलापूर सिव्हिल सर्जन कार्यालयाची राज्यात चर्चा सुरू झाली आहे. एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांने सिव्हिल सर्जन कार्यालयात सुरू असलेला गोरखधंदा उघडकीस आणला आहे. अँटी करप्शनच्या कारवाई मुळे सोलापूर सिव्हिल सर्जन कार्यालयातील भ्रष्ट डोम कावळ्यांचे धाबे दणाणले आहेत. आज नाही तर उद्या भ्रष्ट डोम कावळे अँटी करप्शनच्या जाळ्यात सापडणार आहेत अशी खात्रीशीर माहिती समोर आली आहे.
मागील दीड वर्षांपासून सिव्हिल सर्जन कार्यालयातील एका चेंगट अधिकाऱ्यामुळे इतर कर्मचारी व अधिकारी वैतागले आहेत. चेंगट अधिकाऱ्याच्या रोजच्या त्रासाला कंटाळून इतर कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी सिव्हिल सर्जन कार्यालयात दुकानदारी सुरू केली आहे. सोलापूर सिव्हिल सर्जन कार्यालयातील डोम कावळा मजेत आणि बिनधास्तपणे मलाई गोळा करत आहे. सिक्युरिटी गार्डच्या भरवशावर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील कामकाज सुरू आहे. आरोग्य खात्यातील पुण्यात बसलेला भ्रष्टाचारांच्या त्या सरदाराला महिन्याकाठी मलाई पाठवली जात आहे. त्यामुळे अंधाधुद कामकाज सुरू आहे. सोलापुरातील एका सजग नागरिकाने भ्रष्टाचाराच्या अड्ड्याचा पितळ उघड पाडले आहे.
सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्या नमूद माहितीनुसार तक्रारदार यांच्या लॅबला महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत दाखल होणाऱ्या रुग्णांचे रक्त व लघवीचे नमुने तपासुन रिपोर्ट सादर करण्याचे काम निविदेद्वारे मिळालेले होते. तक्रारदार यांच्या लॅबच्या विरोधात आलेल्या तक्रारी अर्ज हा पुढील चौकशीकामी डॉ. माधव जोशी यांच्याकडे आला होता. सदर तक्रारी अर्जाचे अनुषंगाने डॉ.माधव जोशी यांनी तक्रारदार यांना संपर्क साधुन त्यांचे लॅबचे कामाबाबत माझ्याकडे तक्रार प्राप्त झाल्याचे सांगुन, तुमच्या बाजुने अहवाल वरिष्ठांना पाठवितो असे सांगुन तसेच लॅबविरुध्द रिपोर्ट पाठविल्यास महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत केलेल्या कामाचे उर्वरीत बिल निघणार नाही अशी भिती दाखवुन,त्याकरीता दोन लाख रुपये लाचेची मागणी केली होती. महात्मा फुले जन आरोग्यचे जिल्हा समनव्यक डॉ.माधव जोशी यांनी पहिला हफ्ता म्हणुन तडजोडीअंती एक लाख रुपये लाच मागणी केली होती. याबाबत १७ डिसेंबर २०२४ रोजी पडताळणीत निष्पन्न झाले होते. १८ डिसेंबर २०२४ रोजी सापळा कारवाईमध्ये पहिला हफ्ता म्हणुन एक लाख रुपये लाच रक्कम स्वतः स्विकारताना डॉ.माधव जोशी यास ताब्यात घेतले आहे.
