Ticker

6/recent/ticker-posts

ईव्हीएम बदनामी मोहिम थांबवा...

      
सोलापूर : (संपादकीय) निवडणूक निकालात दिसल महाराष्ट्रात महायुतीच्या बाजूनं जणू काही एक सुनामी लाट आली आहे. आपलं कुठे चुकतंय आणि कुठे बरोबर आहे हे वेळच्यावेळी ज्या राजकारण्यांना समजत नाही किंवा ते त्याला मान्यता देत नाहीत तोपर्यंत अशीच वाताहात होत राहणार. शरद पवार,उद्धव ठाकरे,अगदी राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील सभांना मोठा प्रतिसाद मिळाला. पण ही गर्दी केवळ बघ्यांची होती. मतदानात त्याचं परिवर्तन झालं नाही. राज ठाकरे यांच्या बाबतीतही असंच घडलं आहे. या उलट मोदींच्या सभा गर्दी खेचणार्‍या झाल्या. तसं पाहता यंदा मोदींच्या सभांना महाराष्ट्रात मागच्या तुलनेत कमीच प्रतिसाद मिळाला. पण प्रत्यक्ष मतपेटीद्वारे अधिक प्रतिसाद मिळाला आहे. असो निवडणुकातील निकाल कधी या कधी त्या बाजूने लागणार. शेवटी मतदार हा राजा आहे. त्याचा मूड कधी कोणत्या पद्धतीने फिरेल सांगता येत नाही. राऊत म्हणतात त्या प्रमाणे हा जर ठरवून झालेला निकाल आहे तर त्यांनी कायद्याच्या कसोटीवर,विविध तांत्रिक मुद्द्यांचा आधार घेत ते सिद्ध करून दाखवावं. आपल्या देशात इतके तंत्रज्ञ आहेत ते काही सारे मोदींच्याच विचाराचे आहेत असं नव्हे. कुणी ना कुणी हे चुकीचं कसं चाललंय हे शोधून काढून न्यायालय पुढे सिद्ध केलंच असतं अशा लोकांना शोधा त्यांच्यामार्फत खरं काय खोटं काय जगाला कळू द्या. उभा महाराष्ट्र राऊत यांच्या बाजूने त्याच ताकतीने उभा राहील. आपण म्हणतो तेच सारं काही अंतिम आणि खरं ही जी सवय राऊत यांना तसेच त्यांच्या पक्षांला,त्यांच्या मित्र पक्षांना लागली आहे.
 त्यामुळेच महाराष्ट्रात विरोधकांची शक्ती अत्यंत नगण्य झाली आहे.
 




लोकांनी विरोधकांना सत्ता तर दिली नाहीच. अगदी विरोधी पक्षनेते पद ही मिळू दिलं नाही. इतका दारुण पराभव मध्यंतरी काँग्रेसचा केंद्रामध्ये झाला. त्या पाठोपाठ आता महाराष्ट्रात हे दिसल आहे. नान पटोले यांनी लोकसभेला काही जागा मिळाल्यानंतर महाराष्ट्रात जास्तीतजास्त जागा विधानसभेला मिळाव्यात यासाठी अडेलतट्टूपणा केला. महाआघाडीत अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात उमेदवार दिले गेले. पटोले यांची कार्यपद्धती दिल्लीच्या त्यांच्या नेत्यांनाही पटली नाही. इकडे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत उमेदवार जाहिर करत होते. अगदी अनेक ठिकाणी बी फॉर्म ही घाईघाईन देवून टाकले. आपल्या या चुका,घाईगर्दी मुळ उमेदवार पडले. याचं आत्मतचिंतन कोण करणार? प्रत्येकवेळी अपयश आलं की खापर ईव्हीएमवर कस चालेल. मग लोकसभेचा विजय श्रेय ईव्हीएमला देता का? वायनर मध्ये मोठ्या मताधिक्याने प्रियांका गांधी निवडून आल्या,कर्नाटक सह अनेक मोठी राज्य मिळाली. या निकालानंतर  शरद पवार यांचा करिश्मा आता राज्यव्यापी कमी होवून तो सोलापूर जिल्ह्याभोवती केंद्रीभूत झाला आहे. खुद्द बारामतीतही थोरल्या पवारांना मतदारांनी नाकरल आहे. ठाकरे आणि पटोलेंच्या तुलनेत पवारांची प्रतिक्रिया पराभवानंतर बर्‍यापैकी संयमीत आहे. 





मतदारांनी विरोधकांना नाकारलं आहे हे त्रिवार सत्य जेव्हा ही मंडळी मोठ्या मनानं स्विकारतील तेव्हाच खर्‍या अर्थांन या पक्षाची पुन्हा विश्वासार्हत वाढू लागेलं. मतदारांवर रुसून त्यांच्यावर प्रलोभनाला बळी पडले. असे आरोप करुन विरोधक अपयश झाकू शकत नाहीत. लोकांना विकास हवा आहे. लाडकी बहीण ही प्रभावी ठरली. हे एकच कारण विजयासाठी पुरसे नाही. सारेच मतदार लाभार्थी, प्रलोभानांना बळी पडणारे नसतात आणि नाही. अनेक लोक आजही विचारांनी बळी पडतात. पैसे तर विरोधकांनी ही वाटले आहेतच. आपण पैशात कमी पडलो असे म्हणता मग निवडून आले ते पैशाच्या जिवावर का? अरे म्हंटल की का रे आलचं पराभव मान्य करण्याशिवाय सध्या तरी पर्याय नाही. ईव्हीएम बदनाम मोहिम थांबवा अन्यथा विरोधक जनतेच्या मनातून मुन्नीपेक्षा अधिक बदनाम होतील.

 सौजन्य - अविनाश सी.कुलकर्णी, दैनिक सांज