सोलापूर : दि.१३ (प्रतिनिधी) उच्च न्यायालय विधी समिती, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशाप्रमाणे 10/09/2022 ते 07/10/2022 या कालावधीमध्ये सोलापूर शहर व जिल्हयामध्ये फिरते विधी सेवा तथा लोकन्यायालय या वाहनाच्या वापराद्वारे विधी साक्षरता शिबीरे तथा फिरते लोकन्यायालय प्रमुख जिल्हा न्यायाधीश शब्बीर अहमद औटी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे.
फिरते लोकन्यायालयामध्ये शहर वाहतुक शाखा सोलापूर उत्तर व दक्षिण विभागाची वाहतुकीची एकूण 129 प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 68 प्रकरणे निकाली करण्यात आली. त्याद्वारे या लोकन्यायालयासाठी रूपये 13600/- इतका दंड वसुल करण्यात आला.
10 ते 12 सप्टेंबर 2022 या तीन दिवसांमध्ये सोलापूर शहर, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर यामधील फिरते विधी सेवा तथा लोकन्यायालयाचे आयोजन केले. फिरते विधी सेवा वाहनाद्वारे उत्तर सोलापूर तालुक्यातील बाळे, भोगाव, बाणेगाव व मार्डी या गावांमध्ये विधी साक्षरता शिबीर घेण्यात आले. या शिबीरामध्ये दिवाणी न्यायाधीश एम. जे. मोहोड यांनी बालकांचे कायदेशीर हक्क आणि अधिकार व बालगुन्हेगारीबाबत जनजागृती या विषयावर उपस्थित ग्रामस्थांना माहिती देवून जनजागृती केली. शिबीरामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर या कार्यालयातील पॅनल विधिज्ञ अॅड. देवयानी किणगी आणि अॅड. समीर माशाळे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर या कार्यालयाचे स्वरूप आणि कार्यपध्दतीबाबत लोकांना अवगत केले. शिबीरासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी ए.बी. शेख यांनी परिश्रम घेतले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी, कर्देहळ्ळी, लिंबीचिंचोळी व वळसंग या गावांमध्ये विधी साक्षरता शिबीर घेण्यात आले. शिबीरामध्ये दिवाणी न्यायाधीश पी.बी. वराडे यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 बाबत उपस्थित ग्रामस्थांना माहिती देवून जनजागृती केली. शिबीरामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर या कार्यालयातील पॅनल विधिज्ञ अॅड. रेवण पाटील आणि अॅड. विनायक कुर्ले यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर या कार्यालयाचे स्वरूप आणि कार्यपध्दतीबाबत लोकांना अवगत केले. शिबीरासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक मल्लिनाथ शहाबादे व कर्मचारी व्ही.टी. शिंदे यांनी श्रम घेतले.
तसेच 12/09/2022 रोजी फिरते विधी सेवा वाहनाद्वारे सोलापूर शहर वाहतुक शाखा, जेलरोड पोलीस ठाणे येथे फिरते लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. लोकन्यायालयामध्ये पॅनल प्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश श्रीमती अनुपमा पारशेट्टी यांनी तर पॅनल विधिज्ञ म्हणून अॅड.विकास कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले.
फौजदारी कोर्ट नं. 2 सोलापूरचे कर्मचारी सर्वश्री शमशुद्दीन नदाफ, श्रीराम डोके, दिपक शिंदे, प्रितेश हिंगमिरे आणि ज्ञानेश्वर अलकुंटे यांनी परिश्रम घेतले. तसेच लोकन्यायालय यशस्वी करणेकामी शहर वाहतुक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त परमार, पोलीस निरीक्षक शिंगाडे, पोलीस निरीक्षक सिद, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुळ, पोलीस शिपाई शिंदे व महिला पोलीस कर्मचारी सुनिता घोळे यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करणेकामी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरचे सचिव नरेंद्र जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.