Ticker

6/recent/ticker-posts

...फिव्हर ओपीडी शेतात;महानगरपालिका प्रशासन गाफीलच

सोलापूर : दि.०१ (प्रतिनिधी) कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत सोलापूरकरांनी खूप वाईट दिवस बघितले.अनेक रुग्णांना ऑक्सिजन अभावी आपला जीव गमवावा लागला.आरोग्य प्रशासनावर भयंकर असे ताण निर्माण झाले होते.सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य प्रशासनाने कोरोनाची दुसरी  लाट थोपवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या होत्या.असाच एक उपक्रम सोलापूर पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयाजवळच दोन फिवर ओपीडी सुरू करण्यात आल्या होत्या.काही दिवसापासून सोलापूर क्लब समोरील दोन फिवर ओपीडी मधून एकच फिवर ओपीडी दिसत आहे. दुसरी फिवर ओपीडी त्या ठिकाणवरून गायब झाली आहे.याबाबत शहर आरोग्य अधिकारी डॉ बसवराज लोहारे यांच्या संपर्क करून माहिती विचारली असता त्यांना देखील याबाबत माहिती नाही असे उत्तर दिले.याचा तपास केला असता ,ही फिवर ओपीडी सोलापूर विजापूर महामार्गावर असलेल्या हतुर गावाच्या एका शेतात असल्याची माहिती समोर आली आहे.

आमदार प्रणिती शिंदेच्या हस्ते उदघाटन झाले होते-
कोरोना महामामारीची दुसरी लाट रोखण्यासाठी रुग्णालयासारख्या दोन फिवर ओपीडया पोलीस आयुक्त कार्यालयाच्या जवळच सोलापूर क्लब समोर उभे करण्यात आल्या होत्या.गोरगरीब नागरिकांना या फिवर ओपीडी मधून मोफत उपचार सुरू करण्यात आले होते.आमदार प्रणिती शिंदे ,उपायुक्त जमीर लेंगरे यांच्या उपस्थितीत या फिवर ओपीडीचे उदघाटन झाले होते.जवळपास तीन बेड,ऑक्सिजन सुविधा,एअर कंडिशन युक्त फिवर ओपीडी सुरू झाल्याने सर्वत्र कौतुक झाले होते.




कोरोना महामारी तीव्रता कमी झाली आणि फिवर ओपीडी गायब-
सोलापुरातुन कोरोना महामारीची तीव्रता हळूहळू कमी होत गेली.त्यामुळे प्रशासनाचे देखील  फिवर ओपीडी  वरून लक्ष विचलित झाले.याचाच फायदा घेत अज्ञात इसमानी ही फिवर ओपीडी सोलापूर विजापूर रस्त्यावर असलेल्या हतुर शिवरातील एका शेतात ठेवण्यात आली आहे.महानगरपालिका प्रशासनाने जवळपास 15 ते 16 लाख रुपये खर्चून फिवर ओपीडी सुरू केली होती.पण या पैशाचा चुराडा करून,सोलापूर क्लब समोरील फिवर ओपीडी गायब करण्यात आली आहे.महानगरपालिका प्रशासनाने यावर गंभीर पावले उचलून ,संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज द्यावा आणि संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.