सोलापूर : दि.०५ (प्रतिनिधी) भारताचे ४९वे सरन्यायाधीश म्हणून सोलापूरचे सुपुत्र उदय उमेश लळित हे नामनिर्देशित झाले असून, ऑगस्टमध्ये ते पदभार स्वीकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. हरिभाई देवकरण प्रशालेत त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. लळित यांचे कुटुंब मूळचे कोकणातील. उदय लळित यांचे आजोबा सोलापुरात वकिली करण्यासाठी आले अन् लळित सोलापूरकर झाले. त्यांचे वडील उमेश लळित हेही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायाधीश होते.
उदय लळीत यांच्या बालपणीच्या आठवणीना दिला उजाळा- सोलापूर शहरातील ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने यांनी त्यांच्यासंबंधीच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले की, माझ्या आजोबापासून लळित कुटुंबाचा माने कुटुंबाशी संबंध होता. लळित यांनी वकिली क्षेत्रात नाव कमाविले होते. उदय लळित यांचे आजोबा अण्णासाहेब लळीत यांना सोलापूर शहरात मोठा मानसन्मान होता. उदय लळीत यांनी १९६९ - ७० व १९७०-१९७१ साली हरिभाई देवकरण प्रशालेत 8 वी व 9वी शिक्षण घेतले होते. त्यांच्या सोबत माझ्या मोठ्या बंधूची घट्ट मैत्री होती, असे ऍड धनंजय माने यांनी बोलताना माहिती दिली.
सोलापूरकराना अभिमान- लळित यांचे कुटुंबीय लकी चौक ते हुतात्मा चौक मार्गावर वास्तव्यास होते. उदय लळीत यांची भारताच्या सर न्यायाधीश पदी निवड झाल्याने सोलापूरकरांचा अभिमान आणि स्वाभिमान वाढला असल्याची माहिती ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने यांनी दिली.त्यांच्या वहिनी सविता लळित जनता बँकेच्या चेअरमन होत्या. आता त्या सिविल हॉस्पिटलच्या मागील बाजूस समर्थनगर येथे वास्तव्यास आहेत.आज देखील सरन्यायाधीश उदय लळीत यांचे अनेक नातेवाईक सोलापुरात वास्तव्य करत आहेत.
