Ticker

6/recent/ticker-posts

महिला अन् ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासासाठी व्वा संघटनेचा दिलासा; कुमठा नाका येथे एनसीएमसी स्मार्ट कार्डचे वाटप


डिजिटल प्रक्रियेची अडचण दूर करण्यासाठी विशेष शिबिर; महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा

सोलापूर : शहरातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा एसटी प्रवास अधिक सुलभ,सोयीस्कर आणि सुरक्षित व्हावा,तसेच शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ सहज मिळावा, या उद्देशाने व्वा संघटनेच्या वतीने कुमठा नाका परिसरात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात लाभार्थ्यांना एनसीएमसी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड स्मार्ट प्रवासी कार्डचे वाटप करण्यात आले.

या शिबिराचे आयोजन व्वा संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा विद्याताई लोलगे यांच्या पुढाकारातून करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त विनोद कुलकर्णी यांच्या शुभहस्ते झाले.

यावेळी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते हाजीमलंग नदाफ, मौलाना आर्थिक विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापक सी.ए.बिराजदार,तसेच सायरा शेख आणि तात्यासाहेब भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.


महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल सुविधेचा लाभ
एसटी बस प्रवासामध्ये उपलब्ध असलेल्या विविध शासकीय सवलती आणि डिजिटल प्रवासी सुविधांचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड उपयुक्त ठरत आहे. मात्र,डिजिटल प्रक्रिया,ऑनलाइन अर्ज किंवा स्मार्ट कार्डच्या वापराबाबत माहिती नसल्याने अनेक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो.





ही अडचण लक्षात घेऊन व्वा संघटनेने प्रत्यक्ष शिबिर आयोजित करून लाभार्थ्यांना मार्गदर्शन आणि स्मार्ट कार्ड वाटपाची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या उपक्रमातून मोठा दिलासा मिळाला.



सामाजिक बांधिलकी जपत व्वा चा उपक्रम - सामान्य नागरिकांना शासकीय तसेच डिजिटल सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमासाठी व्वा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी मारता आसादे,वैशाली देशपांडे,लक्ष्मी माने,शारदा मसुदी,स्वाती जाधव,शबाना मुलाणी,पुष्पा हलकुडे,यशोदा सोनावणे आणि गौरा कोरे यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या दैनंदिन अडचणी समजून घेत त्यांना प्रत्यक्ष मदत उपलब्ध करून देणाऱ्या या सामाजिक उपक्रमाचे सोलापूर शहरातून कौतुक होत आहे. डिजिटल युगात ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांना तंत्रज्ञानाच्या सुविधांशी जोडण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.